वाडा: खेड तालुक्यातील पश्चिम भागातील भोरगिरी व परिसरातील भातपिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. पिकावर तातडीने औषधांची फवारणी होणे आवश्यक असताना कृषी विभागाने शेतकर्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
खेडचा पश्चिम भाग हा भाताचे प्रमुख उत्पादन केंद्र मानला जातो. मात्र अलीकडील हवामानातील अनिश्चिततेमुळे पिकावर रोगराईचा कहर दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पावसाने अचानक विश्रांती घेतली व त्यानंतर पडलेल्या कडक उन्हामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगाची लागण झाली. (Latest Pune News)
अधूनमधून पडणारा रिमझिम पाऊस व धुक्यामुळेही परिस्थिती गंभीर झाली आहे. या भागात कडा करपा व तांबेरा रोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तांबेरा रोगात सुरुवातीला पानांचे शेंडे व कडा फिकट हिरवे होऊन करपतात; प्रादुर्भाव तीव्र झाल्यास संपूर्ण पाने करपून भातपीक नष्ट होण्याची वेळ येते. परिणामी ओंब्या न भरल्याने किंवा फुलोर्यावर परिणाम झाल्याने उत्पादनात मोठी घट होते.
गेल्या काही वर्षांपासून या रोगाचा पुनःपुन्हा प्रादुर्भाव होत असूनही कृषी विभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही, अशी टीका खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व संचालक विठ्ठल वनघरे यांनी केली आहे. शेतकर्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याऐवजी अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी बसतात; शेतकर्यांना स्वतःहून जाऊन माहिती घ्यावी लागते, असा त्यांचा आरोप आहे.