बारामती: पुढील आठवड्यापासून शाळा सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनचालकांसाठी सुधारित नियमावली तयार करण्यात आली आहे.
शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या तसेच सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणार्या स्कूल बसचालकांनी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे. (Latest Pune News)
स्कूल बसचालकांनी वाहनाचे फिटनेस, परमिट, वाहन परवाना, विमा आदी कागदपत्रे पूर्ण करून घ्यावीत. शालेय समितीने बैठक घ्यावी. वाहनात अग्निरोधक प्रतिबंधक उपाययोजना करावी. शाळेत मुलांची ने-आण करणारी बस व अन्य वाहने मुलांसाठी सुरक्षित राहतील, याची खबरदारी संबंधित शाळेने घ्यावी.
प्रत्येक बस व इतर वाहनांत सीसीटीव्ही लावावेत. शाळेच्या बसमध्ये लहान मुलांची ने-आण करण्यासाठी महिला कर्मचार्यांची नियुक्ती करावी. वाहनचालक, कंडक्टर, क्लीनर आदींची पोलिस पडताळणी करून घ्यावी.
वाहनचालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असणारे असल्याची खात्री शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे. स्कूल बसचालक व अटेंडंट यांची चारित्र्य पडताळणी, नेत्र तपासणी आणि वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे निर्देश राज्यपातळीवरून देण्यात आले आहेत.
शिक्षण विभागामार्फत शाळास्तरावर परिवहन समिती स्थापन केल्याबाबतचा आढावा घ्यावा. स्कूल बसची तपासणी करावी. खासगी वाहनातून शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबवावी. अपघात रोखण्यासाठी शाळा, परिवहन विभाग, पोलिस विभाग यांच्यामध्ये समन्वय साधला जाणार असल्याचे निकम यांनी सांगितले.