Transfer Pudhari
पुणे

Maharashtra Government Officer Transfer: महसूल विभागात मोठे फेरबदलाचे संकेत; पुणे जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांची तयारी अंतिम टप्प्यात

वार्षिक बदली प्रक्रियेला वेग; 30 जूनपर्यंत आदेश अपेक्षित, दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत अधिकाऱ्यांना बसणार फटका

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्य शासनाच्या वार्षिक बदली प्रक्रियेला वेग आला असून, महसूल विभागातील अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शासनाच्या बदली धोरणानुसार निर्धारित कालावधी पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून, पुणे जिल्ह्यात दीर्घकाळापासून कार्यरत असलेल्या काही अधिकाऱ्यांना यंदा बदलीचा फटका बसण्याची शक्यता आहे.

महसूल विभागातील, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सेवाकाळाचा आढावा घेण्यात येत आहे. प्रशासनात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी नियमित बदल्या आवश्यक असल्याची शासनाची भूमिका आहे. त्यामुळे अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची माहिती संकलित करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यंदाची बदली प्रक्रिया 30 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आतापासूनच हालचाली सुरू केल्याची चर्चा महसूल विभागात रंगू लागली आहे. इच्छित ठिकाणी बदली मिळावी किंवा सध्याचे पद कायम राहावे यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये बदल्यांबाबत अनौपचारिक बैठका आणि चर्चासत्रे सुरू असल्याची कुजबूज प्रशासकीय वर्तुळात ऐकू येत आहे. या चर्चांमध्ये संभाव्य बदल्या, रिक्त पदे आणि नियुक्त्यांबाबत रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात असले तरी याबाबत अधिकृत पातळीवर कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.

महसूल विभागातील या व्यापक फेरबदलांकडे अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, शासनाच्या अंतिम निर्णयानंतर जिल्ह्यातील महसूल प्रशासनाचे चित्र मोठ्या प्रमाणावर बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बदल्यांच्या या हंगामात कोणाची गच्छंती होते आणि कोणाला पसंतीचे ठिकाण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संभाव्य रिक्त पदांवर नियुक्तीसाठी हालचाली

पुणे जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या महसूल कार्यालयांमध्ये अनेक अधिकारी वर्षानुवर्षे कार्यरत असल्याने त्यांच्याबाबत विशेष चर्चा सुरू आहे. आगामी काही दिवसांत बदल्यांचे आदेश जाहीर होण्याची शक्यता असल्याने विभागात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य बदल्यांमुळे रिक्त होणाऱ्या पदांवर नियुक्तीसाठीही हालचाली सुरू झाल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT