वेल्हे: सिंहगड किल्ल्यावर अतकरवाडी पायी मार्गाने चढाई करताना हृदयविकाराचा झटका येऊन सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त राजकुमार गायकवाड (वय 62, रा. मार्केट यार्ड, पुणे) यांचा मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. गायकवाड यांचे प्राण वाचविण्यासाठी त्यांच्या सहकार्यांनी तसेच सिंहगड वन विभाग व हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाने आटोकाट प्रयत्न केले. सिंहगड रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. (Latest Pune News)
अतकरवाडी पायी मार्गावर गायकवाड यांना हृदयविकाराचा तीव्रझटका आला. त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्यासोबतच्या डॉक्टर मित्राने तातडीचे उपचार केले. मात्र, त्यांची प्रकृती अत्यावस्थ बनल्याने त्यांच्या मित्रांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला.
सिंहगड वन विभागाचे वन परिमंडल अधिकारी समाधान पाटील यांनी सुरक्षारक्षक नितीन गोळे, संतोष पढेर, हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू पथकाचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ आदींसह घटनास्थळी धाव घेतली.
गडावर चढाई करताना काही अंतरावर गायकवाड यांच्या छातीत अचानक दुखू लागले, नंतर ते बेशुद्ध पडले. त्यांच्या हृदयाचे ठोके मंदावले. त्यांच्यासोबत असणार्या डॉक्टर मित्राने त्यांना सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्यांना स्ट्रेचरवरून खाली आणले.
याबाबत हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे म्हणाले, या घटनेची माहिती पोलिस ठाण्यात दिली नाही. त्यामुळे याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली नाही. गायकवाड हे ठाणे येथे पोलिस उपायुक्तपदावर काम करीत होते. तेथून ते सेवानिवृत्त झाले.