सुरेश मोरे
कोंढवा: बारमाही खळखळणार्या भैरोबानाल्याला सध्या अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. यामुळे काही ठिकाणी या नाल्याचे पात्र गायब झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यंदा उन्हाळ्यात प्रथमच हा नाला कोरडा पडल्याचे जुन्या पिढीतील जाणकार व्यक्तींनी सांगितले. महापालिका प्रशासनाने नाल्याच्या परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
बोपदेव घाटाच्या कुशीत श्री काळूबाई देवीच्या मंदिरापासून उगम झालेला भैरोबानाला 18 किलो मीटरचा प्रवास करून पुढे मुळा-मुठा नदीला जाऊन मिळतो. येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक, कोंढवा खुर्द आणि वानवडीतून या ओढ्यांचा हा प्रवास मुळा-मुठा नदीकडे झेपावतो. (Latest Pune News)
गेल्या काळात दुष्काळ परिस्थितीत देखील या ओढ्याचा प्रवाह आटला नसल्याचे जाणकार सांगत आहेत. उन्हाळ्यात हा ओढा वन्यजीवांची तहान भागवत असतो. मात्र, सध्या या नाल्यावर ठिकठिकाणी अतिक्रमणे झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या काळात या ओढ्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. यामुळे पावसाळ्यात या ओढ्यावर पूरस्थिती निर्माण होत असून, अनेकांच्या घरात पाणी शिरत आहे. अतिक्रमणांमुळे काही ठिकाणी ओढ्याचे अस्तित्वच गायब झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पावसाळ्यात या ओढ्याला पूर येत असल्याने नागरी वस्तीत पाणी शिरते. 2018 मध्ये या ओढ्याला आलेल्या महापुरामुळे पाच नागरिकांचा मृत्यू झाला होता. तसेच चारचाकी वाहनांसह अनेक गाड्या वाहुन गेल्या होत्या. घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले होते. पावसाळ्या रुद्र अवतार धारण करणारा भैरोबानाला सध्या शांत पाहायला मिळत आहे. याबाबत महापालिकेच्या आधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही.
लोकांचे जीव गेल्यावर अतिक्रमणे काढणार का?
भैरोबानाल्याचे पात्र कोरडे पडण्यामागे यंदा उन्हाची तीव्रता जास्त असल्याचे एक कारण आहे. परंतु, वाढत्या अतिक्रमणांमुळे या ओढ्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्रशासन परिसरात अतिक्रमणे करणार्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे महापुरासारखे गंभीर संकट उद्भवत आहे. यामुळे आगामी काळात सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाला धोका पोहचू शकतो. लोकांचे जीव गेल्यावर प्रशासन या ओढ्यावरील अतिक्रमणे काढणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गेल्या काळात भैरोबानाल्याचा प्रवाह कधी आटल्याचे पाहावयास मिळाले नाही. या ओढ्यातून कायमस्वरूपी वाहणार्या पाण्यामुळे मुक्या जनावरांसह पक्ष्यांची ताहन भागते. मात्र, यंदाच्या उन्हाळ्यात या नाल्याचा प्रवाह प्रथमच आटल्याचे दिसून आले. काही ठिकाणी ड्रेनेजचे पाणी वाहात आहे. या नाल्याच्या संवर्धनसाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.- किसनराव केदारी, सामाजिक कार्यकर्ते, वानवडी