पुणे : पावसाळ्याच्या दिवसांत होणारे अपघात टाळण्यासाठी राज्य रस्तेविकास महामंडळाने (एमएसआरडीसी) जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 अपघातप्रवण स्थळांची (ब्लॅक स्पॉट) दुरुस्ती केली. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण घटले आहे, अशी माहिती राज्य रस्तेविकास महामंडळाचे मुख्य अभियंता राहुल वसईकर यांनी दिली. मागील वर्षी याच भागात वेगवेगळ्या अपघातांत सुमारे 88 जणांचा मृत्यू झाला होता. (Pune News Update)
जुन्या पुणे-मुंबई महामार्गाचे (राष्ट्रीय महामार्ग 48) काही भाग अपघातप्रवण म्हणून ओखळले जातात. त्यावर महामंडळाने सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या मदतीने विविध उपाययोजना सुचविल्या. 15 अपघातप्रवण स्थळांची (ब्लॅक स्पॉट) पडताळणी करून आकडेवारीच्या आधारे आणि अभियांत्रिकी उपायांतून तोडगा काढण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील अपघातांचे प्रमाण कमी होऊन मृत्यूमुखी पडणार्यांच्या संख्येत घट झाली आहे. सोमाटणे फाटा येथील टोल नाक्याजवळील लडकत पेट्रोल पंपापासून महानगर गॅस लिमिटेड कंपनीपर्यंत असलेल्या भागातील 15 अपघातप्रवण स्थळांचा यामध्ये समावेश आहे.
त्यातही प्रामुख्याने वडगाव फाटा, कामशेत घाट परिसर, शिलाटणे फाटा आणि खालापूर भागाचा समावेश आहे. या भागातील दुरुस्तीमध्ये कमी दृश्यमानता, पादचार्यांना असणारा धोका, वेगाने येणार्या वाहनांसाठी गतिरोधक, यांवर काम केले गेले. तसेच, या ठिकाणी मध्यवर्ती बंदिस्त भिंत अर्थात डिव्हायडरचा वापर, वेग कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त असुरक्षित पद्धतीने वाहने चालविणार्यांवर कारवाई करण्यासाठी कॅमेर्यांचा वापर होत आहे.
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. महामंडळाच्या अन्य मार्गांवरही अशाच उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.राहुल वसईकर, मुख्य अभियंता, एसएसआरडीसी, पुणे
या महामार्गावर 2018 मध्ये 269 मृत्यू झाले होते. हे प्रमाण 2014 मध्ये 67 टक्क्यांनी कमी होऊन 88 मृत्यू झाले, तर 2025 च्या पहिल्या तिमाहीत केवळ 6 मृत्यू झाले आहेत. 2024 च्या पहिल्या तिमाहीत ही संख्या 24 होती.