खडकवासला / पुणे: पुण्याला पाणीपुरवठा करणार्या खडकवासलासह वरसगाव व पानशेत धरण क्षेत्रातील सरकारी मालकीच्या संपादित जमिनीवरील बेकायदा अतिक्रमणांवर तसेच धरणात सांडपाणी, मैलापाणी सोडणार्यांवर कठोर कारवाई करावी, असा आदेश शनिवारी जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
जल व्यवस्थापन कृती पंधरवडानिमित्त विखे यांनी पानशेत, वरसगाव, टेमघरसह जिल्ह्यातील धरणांची पाहाणी केली. शनिवारी सकाळी पावणेदहा वाजता वरसगाव येथे त्यांचे आगमन झाले जवळपास दीड तास त्यांनी वरसगाव व पानशेत धरणांची पाहणी केली.
अधिकार्यांची बैठक घेऊन अतिक्रमणे, मैलापाणी आदींवर सविस्तर चर्चा केली. नियमानुसार तातडीने कारवाई तसेच आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले. धरणातील गाळाचे सर्व्हेक्षण करून कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या.
या वेळी आमदार राहुल कुल, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे, पानशेतचे शाखा अभियंता अनुराग मारके, वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगंळ आदी उपस्थित होते.
खडकवासला, पानशेत, वरसगावसह सर्व अतिक्रमणे काढण्यात यावीत, असे आदेश जलसंपदा मंत्र्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दिले होते. त्यानंतर अतिक्रमण करणार्या संबंधितांना समक्ष भेटून जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी अतिक्रमणे स्वतःहून काढण्यात यावीत, अशा सूचना दिल्या. मात्र, अद्यापही बहुतांश ठिकाणी अतिक्रमणे तशीच आहेत.
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले की, जलसंपदामंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार खडकवासला साखळीतील सर्व धरण क्षेत्रासह मुठा कालव्यावरील अतिक्रमणांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अतिक्रमणधारकांना समक्ष भेटून सूचना दिल्या आहेत. त्यांनी स्वतःहून अतिक्रमणे न काढल्यास धडक मोहीम राबवून अतिक्रमणे जमीनदोस्त केली जातील.
धरणातील गाळ काढण्यासाठी सर्वेक्षण करा
गाळ साचल्यामुळे धरणातील पाणी साठवण क्षमता कमी होते. त्यामुळे पानशेत व वरसगाव धरणांतील गाळाच्या प्रमाणाचे सर्वेक्षण करून गाळ काढण्याच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले.
जलसंपदामंत्र्यांची पवना धरणालाही भेट
पवनानगर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी (दि. 26) पवनानगर येथील पवना धरणाला भेट देऊन धरण सुरक्षा, पाण्याचे काटेकोरपणे नियोजन, पाणी प्रदूषण व धरण परिसरामध्ये होणारे अतिक्रमणावर चर्चा केली. या वेळी आमदार सुनील शेळके, आमदार राहुल कुल आदी अधिकारी उपस्थित होते.
अतिक्रमणांसह धरणात मिसळणार्या मैलापाणी, सांडपाण्याची समस्या गंभीर बनली आहे. अधिकार्यांनी जलप्रदुषणाला जबाबदार असलेल्यांवर सुधारित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.- राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ)