पुणे

काैतुकास्पद : ई-गव्हर्नन्समध्ये महापालिका राज्यात पुन्हा प्रथम

Laxman Dhenge
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ई-गव्हर्नन्स निर्देशांक 2024 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने महाराष्ट्रात राज्यात पुन्हा अव्वल स्थान राखत प्रथम क्रमांक मिळविला आहे. महापालिकेने विविध गटात 103 पैकी 74 गुण मिळवित आपले स्थान कायम ठेवले आहे. प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमधील वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता आणण्याकरिता तसेच, सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. महापालिकेने प्रशासकीय कामकाजामध्ये नवनवीन संकल्पना आणि कार्यपद्धतींचा अंगीकार केला आहे.
शिवाय लोकाभिमुख कार्यालयाचे व्यवस्थापन केले असून, नागरिकांना ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून विविध विभागांमार्फत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेचे कामकाज ऑनलाइन माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरिक घर बसल्या ऑनलाइन माध्यमातून महापालिकेशी संबंधित काम करत आहेत. ती संख्या वाढत आहे.   या सर्वेक्षणात महापालिकेस उपलब्धता गटासाठी 20 पैकी 14, सेवा गटात 45 पैकी 23, पारदर्शकता गटात 55 पैकी 27 असे एका विभागात 120 पैकी 74 गुण प्राप्त केले.
संकेतस्थळ गटात 62 पैकी 48, मोबाईल अ‍ॅपसाठी 52 पैकी 24, डीजिटल मीडियासाठी 6 पैकी 2 असे या विभागात 120 पैकी 74 गुण मिळविले आहेत. तर, निर्देशांकात 10 पैकी 7.18 गुण मिळवीत प्रथम क्रमांक मिळविला आहे. राज्यातील 27 महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाचे सर्वेक्षक करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन (पीआरओ) या खासगी संस्थेने केले आहे. या सर्वेक्षणात पुणे चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबई दुसर्‍या, कोल्हापूर तिसर्‍या आणि अमरावती पाचव्या स्थानावर आहे.
आदर्श बदल घडविण्याच्या ध्येयाकडे वाटचाल
महापालिकेने नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराच्या मदतीने नागरिकांना जलद व सुलभ पद्धतीने जास्तीत जास्त सुविधा देण्यावर भर दिला आहे. महापालिकेस ई-गव्हर्नन्स निर्देशांकात मिळालेले अव्वल नामांकन त्याचाच पुरावा आहे. शहरी विकासात एक आदर्श बदल घडविण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत असताना मिळालेली ही कौतुकाची थाप नक्कीच महापालिकेच्या कामकाजात आधिकाधिक सुधारणा करण्यासाठी आणखी प्रोत्साहन देईल.
– शेखर सिंह, आयुक्त 

हेही वाचा

SCROLL FOR NEXT