पुणे: पायाभूत सुविधा क्षेत्रातील मोठी कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आपला पुणे-सातारा टोल रोड (पीएसटीआर) प्रकल्प विकण्याचा निर्णय घेतला आहे. सिंगापूरस्थित ‘क्यूब हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर’ ही कंपनी सुमारे दोन हजार कोटी रुपयांना या प्रकल्पाचे 100 टक्के हक्क विकत घेणार आहे. या व्यवहारामुळे रिलायन्स इन्फ्राला कर्जमुक्त होण्यास मोठी मदत मिळणार आहे.
रिलायन्स इन्फ्राने आपल्या कमी महत्त्वाच्या मालमत्ता विकून आर्थिक स्थिती मजबूत करण्याचे धोरण अवलंबले आहे. याच धोरणाचा भाग म्हणून पुणे-सातारा टोल प्रकल्पाची विक्री केली जात आहे. या सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या व्यवहारामुळे कंपनीला 600 कोटी रुपये समभागापोटी मिळतील, तर तब्बल 1,400 कोटी रुपयांचा कर्जभार कमी होईल. (Latest Pune News)
या निधीचा उपयोग कंपनी इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी करणार आहे. या व्यवहारामुळे कंपनी जवळजवळ कर्जमुक्त होईल, जे आर्थिक शिस्तीचे निदर्शक मानले जाते.
यापूर्वी 2020 मध्ये रिलायन्स इन्फ्राने आपला दिल्ली-आग्रा टोल प्रकल्प 3,600 कोटी रुपयांना ‘क्यूब हायवेज’लाच विकला होता. त्यामुळे दोन्ही कंपन्यांमधील हा दुसरा मोठा व्यवहार ठरणार आहे. या विक्रीमुळे महामार्गाच्या दैनंदिन कामकाजावर किंवा टोल दरावर कोणताही परिणाम होणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.