पुणे

पॅरामेडिकलच्या उमेदवारांची कौन्सिलद्वारे नोंदणी

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलद्वारे नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचा पॅरामेडिकल क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराचा मार्ग मोकळा झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल यांनी प्रशिक्षीत उमेदवारांना नोंदणी दिली असून मंडळांतर्गत पॅरामेडिकल गटात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी नोंदणी करण्याकरीता तत्काळ अर्ज करावेत असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. लोढा म्हणाले, बर्‍याच वर्षांपासून प्रलंबित असलेली विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाली. त्यामुळे देशातच नव्हे तर परदेशातही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित आरोग्य सेवकांची मागणी वाढत आहे.

महसूल आणि रोजगार या दोन्ही बाबतीत आरोग्यसेवा हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. या क्षेत्रात रुग्णालये, वैद्यकीय उपकरणे, क्लिनिकल चाचण्या, आउटसोर्सिंग, टेलिमेडिसिन, वैद्यकीय पर्यटन, आरोग्य विमा, वृध्दांची काळजी आणि वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश होतो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने तयार केलेला अहवाल सूचित करतो की भारतातील प्रशिक्षित आरोग्य व्यावसायिकांची मागणी 50 लाख आहे, तर उपलब्धता केवळ 12 लाख आहे. तसेच एका डॉक्टर मागे साधारणत 5 क्लिनिकल आणि 5 नॉन-क्लिनिकल आरोग्य सेवकांची आवश्यकता असते.

भारतात वैद्यकीय पदवी व पदुव्यत्तर शिक्षण उच्चत्तम गुणवत्तेचे आहे. वैद्यकीय पदवी व पदुव्यत्तर शिक्षणानंतर राज्य वैद्यकीय परिषदेद्वारे नोंदणी करण्यात येते. त्याच प्रमाणे आरोग्य सेवकांसाठी पदविका अभ्यासक्रमांत व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पॅरामेडीकल कौन्सिलद्वारे नोंदणी देण्याचे निर्देशीत आहे. मंडळाद्वारे पॅरामेडिकल गटातील 30 प्रमाणपत्र अभ्यासक्रम व 11 पदविका अभ्यासक्रमात प्रति वर्षी राज्यभरातील 300 संस्थांमधून साधारणत: 10 हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येते. मंडळाने पॅरामेडिकल गटातील अभ्यासक्रमांत मागील 3 वर्षात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचे निकालपत्र महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल यांच्याकडे नोंदणी प्रक्रियेत पडताळणीसाठी सादर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलकडे अर्ज केलेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र व गुणपत्र पडताळणी सोयीस्कर झाले आहे. नोंदणीसाठी https:///www. maharashtraparamedicalcouncil. org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.

पॅरामेडिकल क्षेत्रात या अभ्यासक्रमांचा समावेश

पॅरामेडिकल क्षेत्रातील लोकप्रिय अभ्यासक्रमामध्ये वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, किरणोपचार/ अल्ट्रासोनिक तंत्रज्ञ, हृदयचिकित्सा तंत्रज्ञ, मज्जातंतुशास्त्र तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, ऑप्टोमेट्राय तंत्रज्ञ, शस्त्रक्रियागार तंत्रज्ञ, रक्तशुद्धीकरण तंत्रज्ञ या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT