पुणे

लेखी परीक्षेत पास होऊनही रुजू होण्याकडे पाठ

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भूमिअभिलेख विभागाने राज्यभरात 1 हजार 113 भूकरमापक (सर्व्हेअर) पदासाठी परीक्षा घेऊन उत्तीर्ण उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार नियुक्ती केली आहे. त्यानुसार 900 भूकरमापक कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे उर्वरित जागांसाठी प्रथमच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या 15 ऑगस्टपासून पात्र उमेदवारांना आरक्षणनिहाय गुणवत्ता यादीनुसार निवडपत्र पाठविण्यात येणार असून, उमेदवारांना 31 ऑगस्टपर्यंत निवड समितीसमोर कागदपत्र सादर करण्यासंदर्भात मुदत देण्यात येणार आहे.

भूमिअभिलेख विभागाकडून 9 डिसेंबर 2021 मध्ये या भूकरमापक पदासाठी ऑनलाइन अर्ज मागवून परीक्षा घेण्यात आली. त्यानुसार राज्यभरात जवळपास 70 हजारांहून अधिक अर्ज आले होते. या अर्जांची छाननी करून चाळीस हजारांहून अधिक उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. त्यानुसार पुणे विभागात 263, नागपूर विभागात 189, कोकण-मुंबई विभागात 244, नाशिक विभागात 102, छत्रपती संभाजीनगर 207, तर अमरावती विभागात 108 रिक्त जागांसाठी निवड करण्यात आली.

त्यापैकी केवळ 900 उमेदवार प्रत्यक्षात कामावर हजर राहिले आहेत. या उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेत त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली, तर 213 जागा अद्याप शिल्लक आहेत. या उमेदवारांना 31 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली असून, त्यांना विहित कालावधीत निवड समितीसमोर कागदपत्रांची पूर्तता सादर करावी लागणार आहे. कागदपत्र तपासणीनंतर संबंधित उमेदवारांची मुलाखत घेऊन नियुक्तिपत्र देण्यात येईल, अशी माहिती भूमिअभिलेख विभागातून देण्यात आली.

प्रथमच प्रतीक्षा यादी

प्रत्यक्षात कामावर रुजू झालेल्या 900 उमेदवारांना कार्यालयीन कागदपत्रे पडताळणी प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यानंतर या उमेदवारांना छत्रपती संभाजीनगर येथे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यासाठी अभियांत्रिकी तसेच अनुभवी अधिकार्‍यांमार्फत प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे, तर उर्वरित जिल्हानिहाय रिक्त जागांची संख्या पाहून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. यंदा प्रथमच प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली असून, पात्र उमेदवारांना 15 ऑगस्टपासून निवडपत्र पाठवून 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात येणार आहे.

– आनंद रायते,
अतिरिक्त आयुक्त, भूमिअभिलेख विभाग

हेही वाचा

SCROLL FOR NEXT