Refrigerator Gas Leakage Fire Pudhari
पुणे

Refrigerator Gas Leakage: रेफ्रिजरेटरमधील गॅस गळतीने स्फोट; दिवाळीत भाकरे कुटुंबाचा संसार आगीत खाक

शिरूर तालुक्यातील माळवाडीत घराला आग; फर्निचर, कपडे, धान्य, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही

पुढारी वृत्तसेवा

टाकळी हाजी: माळवाडी (ता. शिरूर) येथे रेफ्रिजरेटरमधील गॅस गळतीमुळे स्फोट होऊन घराला आग लागली. ही घटना शनिवारी (दि. १४) रात्री घडली. यात घरातील संसारोपयोगी साहित्य, फर्निचर, कपडे, धान्य, भजनाचे साहित्य, तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. या दुर्घटनेत संदीप गोविंद भाकरे यांच्या कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. ऐन दिवाळीत या कुटुंबावर संकट कोसळले.

माळवाडी शाळेजवळ राहणाऱ्या संदीप भाकरे यांच्या घरात शनिवारी रात्री रेफ्रिजरेटरमधून गॅस गळती होऊन स्फोट झाला. आगीमुळे घरातील बहुतांश साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घरात झोपलेल्या एका महिलेला जाग आल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

घटनेनंतर महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा केला. यामध्ये रेफ्रिजरेटर, टीव्ही, कपाट, सोफा, कपडे व साड्या, मिक्सर, पंखे, भांडी, मोबाईल, धान्य जळून नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, भाकरे कुटुंबाचे रेशनकार्ड, आधारकार्ड, मुलांच्या शाळेतील गुणपत्रिका यांसह महत्त्वाची कागदपत्रेही आगीत नष्ट झाली. पखवाज व अन्य साहित्याचेही नुकसान झाले.

या घटनेची माहिती शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी तातडीने दखल घेत ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांना घटनास्थळी पाठविले. त्यांनी नुकसानीचा पंचनामा केला. पंचनाम्याच्या आधारे शासनाने तातडीने नुकसानीची दखल घेऊन आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संदीप भाकरे यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT