उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : इन्स्ट्राग्रामवर साडेचार लाख फॉलोअर्स असलेल्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका रील्स स्टार तरुणाला बदनामी करण्याची धमकी देऊन 2 लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या धर्मेंद्र बाळासाहेब बडेकर (वय 30, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी महेश ऊर्फ मल्लाप्पा साहेबान्ना होसमानी (रा. शिंदवणे, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 15 जानेवारीपासून आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेद्र ऊर्फ सोनू बडेकर हे उरुळी कांचन परिसरात राहत असून, ते इन्स्टाग्रामवर रिल्स, व्हिडिओ बनवितात. त्यांचे साडेचार लाख फॉलोअर्स आहेत. एका मित्राने आरोपी महेश याची ओळख त्यांच्याशी करून दिली. महेश याने फिर्यादी यांना सासुरवाडीला कार्यक्रम आहे, त्यासाठी एका दिवसासाठी सोन्याची चेन देण्याची विनंती केली. त्यानुसार फिर्यादी यांनी त्याला 18 तोळे वजनाची सोन्याची चेन दिली. काही दिवसांनी त्यांनी चेन परत मागितल्यावर ती गहाण ठेवली असून, सोडविण्यासाठी 20 हजार रुपये देण्याची मागणी केली. फिर्यादी यांनी त्याला 20 हजार रुपये दिले. तरीही चेन परत न केल्याने फिर्यादी यांनी ही बाब भावाला सांगितली. त्यांच्या भावाने माहिती काढल्यावर महेश होसमानी हा गुन्हेगार असून, त्याच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडून पोलिसांनी खूप सोने हस्तगत केले आहे, असे समजले. त्यानंतर फिर्यादी यांनी शिंदवणे येथे जाऊन त्याची भेट घेतली असता त्याने उलट फिर्यादी यांना धमकावले.
मी तुला चोरीचे सोने दिले, असे सांगून तुला गुन्ह्यामध्ये गुंतवेल, अशी धमकी देऊ लागला. तू मोठा रील्स स्टार आहेस ना, आता बघ मी कशी तुझी सगळी हवा काढतो, तू मला आताच्या आता 3 लाख रुपये दे, नाही तर मी तुझी सोशल मीडियावर बदनामी करेल, अशी धमकी देऊन बदनामीकारक व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट केला. ही बाब फिर्यादींना समजल्यावर त्यांनी महेश याला फोन केला. तेव्हा त्याने बदनामी करून गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी दिली. दरम्यान, फिर्यादी यांनी घाबरून त्याला 2 लाख रुपये दिले. त्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली. पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख या घटनेचा तपास करीत आहेत.
हेही वाचा :