पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील देखावे पाहण्यासाठी येणार्या गणेशभक्तांसाठी येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सज्ज असून, बाहेरून येणार्यांसाठी आणि रात्री पुन्हा परतण्यासाठी जादा गाड्या सज्ज ठेवल्या आहेत. त्यासोबतच काही अनुचित घटना घडू नये, याकरिता शहरात कडक पोलिस बंदोबस्त असणार आहे.
दरवर्षी पुण्यातील गणपती पाहाण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सासवड, बारामती, सोलापूर भागातून भाविक येतात. त्यांच्यासाठी यंदा 23 रोजी एसटी प्रशासनाने स्वारगेट आगारांतर्गत नियोजित गाड्यांव्यतिरिक्त 30 जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. दि. 24 रोजी स्वारगेट आगारांतर्गतच 50 जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.
पीएमपी प्रशासनाकडून देखावे पाहाण्यासाठी येणार्या गणेशभक्तांसाठी जादा 640 बस गाड्यांचे नियोजन केले आहे. रात्री 10 नंतर दैनंदिन बस गाड्यांचे संचलन बंद होऊन स्पेशल गाड्या म्हणून पीएमपीची सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे रात्री प्रवास करताना प्रवाशांना नियमित तिकीट दरापेक्षा 5 रुपये अतिरिक्त भरावे लागणार आहेत. तसेच, रात्रीच्या वेळी या स्पेशल बसच्या सेवेमध्ये पीएमपीचा कोणताही पास चालणार नाही. तसेच, पिंपरी-चिंचवड भागातून 270 जादा बस पुणेकरांना सेवा पुरवतील, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले.
मेट्रो प्रशासनाच्या वतीने देखावे पाहण्यासाठी येणार्या गणेशभक्तांसाठी मेट्रोच्या सेवेत वाढ करण्यात आली आहे. सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी (दि. 28) सकाळी 6 ते रात्री 2 पर्यंत मेट्रोच्या प्रवासी सेवेत वाढ करण्यात येणार आहे, असे मेट्रो प्रशासनाने सांगितले.
हेही वाचा