पुणे

पुणे : वाचन ही काळाची गरज; विजय पारगे यांचे मत

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'वाचन ही काळाची गरज आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी दैनंदिन अभ्यासासह अवांतर वाचनावरीही भर द्यावा. तसेच शिक्षक व पालकांचे वेळोवळी मार्गदर्शन घ्यावे,' असे मत पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे यांनी व्यक्त केले. कर्वेनगर येथील सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक शाळेमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन व वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी पारगे बोलत होते. याप्रसंगी वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेता संघाचे सचिव अरुण निवंगुणे, दीपक निवंगुणे, अतुल पारगे, महादेव मेमाणे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्याध्यापिका अनघा सायगावकर यांनी विजय पारगे यांचा सन्मान केला. 'वाचाल तर वाचाल' असा संदेश देऊन विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून वाचनाचा छंद जोपासण्याचा सल्लाही सायगावकर यांनी या वेळी दिला. दैनिक 'पुढारी'च्या वतीने वितरण व्यवस्थापक वैभव जाधव यांनी विध्यार्थ्यांना वृत्तपत्राच्या कार्यप्रणालीबाबत माहिती देऊन वाचनाचे महत्त्व सांगितले. ग्रंथपाल प्रज्ञा वैद्य, शिक्षक स्फूर्ती देशपांडे, पंचशीला सरतापे, ललिता वाघ, संध्या बुरुड, स्नेहल कुलकर्णी, तनुजा जावळे, निलेश देवरे आदी या वेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन संगीता कोरडे यांनी केले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT