Ravangaon Tragic Incident
रावणगाव : रावणगाव (ता. दौंड) येथील रानमळा वस्ती परिसरात बुधवारी (दि. १) मध्यरात्रीच्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली. पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला आणि काही वेळातच स्वतः गळफास घेऊन जीवन संपविले. या प्रकरणी दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
खून झालेल्या महिलेचे नाव जयश्री अशोक गावडे (वय ४५) असून आत्महत्या करणारे पती अशोक मारुती गावडे (वय ५०) आहेत. दोघेही पती-पत्नी शेती करून उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या मागे दोन मुले आहेत. पत्नीचा खून केल्यानंतर अशोक गावडे यांनी राहत्या घरात सिलिंग फॅनला गळफास घेऊन जीवन संपविले.
दसरा सणाच्या दिवशीच सकाळी ही घटना उघडकीस आली. ऐन सणासुदीत घटना घडल्याने या परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेच्या रात्री अशोक व जयश्री या पती-पत्नीमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. घरात कोणीच नसल्याने घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. याबाबत माहिती दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.