पुणे: ‘फळांचा राजा’ म्हणून ओळख असलेल्या कोकणातील हापूस आंब्याच्या तीन डझनांच्या चार पेट्यांची शुक्रवारी (दि. 23) गुलटेकडी मार्केट यार्डात आवक झाली. तीन डझनांच्या या पेटीला 15 हजार रुपये भाव मिळाला.
रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर भागातून ही आवक झाली. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश घुले, फळे व तरकारी विभागप्रमुख बाळासाहेब कोंडे व अडतदार युवराज काची यांच्या हस्ते आंब्याच्या पेटीचे पूजन झाले. काची यांनी या आंब्याच्या पेटीची खरेदी केली.
रत्नागिरी हापूस आंब्याचा नियमित हंगाम हा मार्च महिन्यापासून सुरू होतो. त्यापूर्वी बाजारात हंगामपूर्व हापूस आंब्याची तुरळक आवक होत असते. शुक्रवारी झालेली ही आवक हंगामपूर्व असून, मार्च महिन्यात हंगाम सुरळीत सुरू होण्याचा अंदाज आहे. हापूसच्या पेटीसह केशर आंब्याच्या एका पेटीची आवक झाली.
या आधीही बाजार कोकणातून हापूसच्या पेटीची आवक झाली आहे. सद्य:स्थितीत आवक तुरळक असली, तरी येत्या काळात ही आवक वाढत जाणार आहे. आवक तुरळक असल्यामुळे दर अधिक आहे. मात्र, आवक वाढत गेल्यास दरात घट होईल, अशी शक्यता व्यापारीवर्गाकडून व्यक्त करण्यात आली.
यंदा थंडी अधिक प्रमाणात पडली आहे. आंब्याच्या झाडांना मोहोर अधिक प्रमाणात आहे. मोहोर टिकून आहे तसेच हवामान पोषक असल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा झाडांना फळधारणा अधिक असणार आहे. येत्या 15 ते 20 फेबुवारीपासून हापूसची आवक सुरू होईल. हंगामात आवक चांगली राहिल्यास दरही मागील वर्षीच्या तुलनेत कमी राहतील, असा अंदाज आहे.युवराज काची, हापूसचे अडतदार, मार्केट यार्ड