पिंपरी : शहरात दिवाळीनंतर नवी सात रेशन धान्य दुकाने सुरू होणार होती; मात्र वेगवेगळ्या कारणांनी त्यांची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता सध्या शहरात महापालिका निवडणुकीच्या कामामध्ये अधिकारी, कर्मचारी व्यस्त असल्याने अद्याप नवी दुकाने सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आणखी महिनाभर शिधापत्रिकाधारकांना घरापासून लांब अंतरावरील दुकानात जाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.
पुणे जिल्हाधिकारी यांनी पिंपरी- चिंचवड शहरात नव्याने सात रेशन दुकानांना मंजुरी दिली होती. या दुकानांना कारभार हा थेट महिला बचत गटाकडे सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे आता स्वस्त धान्य दुकानांची संख्या 253 वरुन 260 वर पोहोचली आहे. सध्या 28 महिला बचत गट रेशन दुकाने चालवत आहेत. त्यात आता नव्याने सात दुकानांचा समावेश होणार आहे. त्यापैकी डांगे चौक, रहाटणी, पिंपळे निलख, मामुर्डी, वैभवनगर, दापोडी, चिंचवड स्टेशन येथे ही रेशन दुकाने सुरु करण्यात येणार आहेत.
दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून ही दुकाने सुरु होणार असे सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप ती सुरु झाली नाहीत. त्यात दाट लोकवस्तीसारख्या भागात ही दुकाने असल्याने ती लवकर सुरु व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. शहरात जवळपास 4 लाख 93 हजार 873 शिधापत्रिकाधारक या वितरण व्यवस्थेचा लाभ घेत आहेत.
नव्याने दुकाने होत असल्याने अनेकांना लांब अंतरावरील दुकानात न जाता जवळच्या दुकानात धान्य घेणे सोयिस्कर ठरणार आहे; परंतु वेगवेगळया कारणांनी या दुकानांचा मुहूर्त पुढे ढकलण्यात येतो. त्यातच आता आचारसंहितेमुळे पुन्हा पुढील महिन्यात ही दुकाने सुरु होणार असे सांगितले जात आहे.
शिधापत्रिकेवर मिळणारी ज्वारी धान्यवाटप येत्या जानेवारीपासून थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात ज्वारी वाटप शेवटचे असणार आहे. नागरिकांना गहु व तांदळासोबतच हा पर्याय होता. मात्र, काहींनी या ज्वारीच्या गुणवत्तेबाबत तक्रारी केल्या होत्या. पुढील महिन्यांसाठी ज्वारीचा कोटा उपलब्धेबाबत कोणताही आदेश प्राप्त नसल्याने पुढे वाटप होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील धान्य वितरण सेवा गेल्या पंधरा दिवसात पूर्णतः विस्कळीत झाली होती. त्यामुळे आता उरलेल्या दिवसांत लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे. या महिन्यात धान्य उशिरा आल्याने शिधापत्रिकाधारकांना हेलपाटे घालावे लागले; तसेच नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागले होते. दरम्यान, सध्या ई पॉस मशिन सुरळीत झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.