वेल्हे: राजगड, तोरणा किल्ल्यांच्या जंगलात प्रथमच दुर्मीळ चौसिंगा जातींच्या हरिणांचे वास्तव्य असल्याचे वन विभागाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. तोरणा किल्ल्याच्या पायथ्यालगत वेल्हे बुद्रुक (ता. राजगड) येथील एका गोठ्यात चौसिंगा हरणाची दोन पाडसे आढळून आली आणि त्यांना जीवदान देण्यात राजगड वन विभागाला यश मिळाले.
शनिवारी (दि. 27) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कैलास बोराणे यांच्या गायी- वासरांमध्ये रानातून दोन पाडसे गोठ्यात आली. स्थानिक रहिवाशी किशोर कोळपे, प्रसाद सांगळे, मंगेश पवार, सचिन गायखे, रामभाऊ राजिवडे आणि विनोद दिघे यांनी पाडसाच्या आईचा शोध घेतला, पण ती सापडली नाही. दोन्ही पाडसे दीड ते दोन महिन्यांची आहेत. (Latest Pune News)
राजगड तालुका वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे, वनपरिमंडळ अधिकारी वैशाली हाडवळे आणि स्थानिक वनरक्षक शुभांगी जगताप यांनी पाडसांची काळजी घेतली. पाऊस आणि थंडीत गारठलेल्या पाडसांना जीव वाचवण्यासाठी बावधन येथील प्राणी उपचार केंद्राशी संपर्क साधून रात्री उशिरा दोन्ही पाडसे तिथे दाखल करण्यात आली.
लांडगे म्हणाले, मराजगड तोरणासह पानशेत, रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यावर चौसिंगा जातीचे हरिण दुर्मीळ असून, या पाडसांच्या आढळण्यानंतर येथे प्रथमच या जातीचे हरिण वास्तव्य करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. वन विभाग चौसिंगा हरिणांसह इतर दुर्मीळ प्राण्यांचा अधिवास सुनिश्चित करण्यासाठी विशेष मोहीम राबविणार आहे.