‌Kalubalu tamasha performance Pudhari
पुणे

‌Kalubalu tamasha performance: ’काळूबाळू‌’च्या पाचव्या पिढीचीही रसिकांवर जादू; रांजणीत पीर साहेब महाराज यात्रेनिमित्त तमाशाचे आयोजन

विनोदी बतावणीने रसिकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या काळूबाळू तमाशा मंडळाची परंपरा अत्यंत वैभवशाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

पारगाव: रांजणी येथे पीर साहेब महाराज यात्रा उत्सवानिमित्त तब्बल पंधरा वर्षांनंतर विनोद समाट काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळाचा करमणुकीचा कार्यक्रम रंगला. पारंपरिक लोकनाट्य तमाशाची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंडळाने नेहमीप्रमाणे प्रेक्षकांची दाद मिळवत उत्कृष्ट सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.

विनोदी बतावणीने रसिकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या काळूबाळू तमाशा मंडळाची परंपरा अत्यंत वैभवशाली आहे. सांगली जिल्ह्यातील खाडे कुटुंबातील सातू-हिरू कवलापूरकर, त्यानंतर शिवा-संभा कवलापूरकर, पुढे रामचंद्र-शामराव- भीमराव-लहू ऊर्फ काळू-अंकुश ऊर्फ बाळू यांनी तमाशा कला जपली. आजची पाचवी पिढी लोककला जिवंत ठेवण्यासाठी झटत आहे.

त्यामध्ये विजयकुमार खाडे, संभाजी खाडे, सुनील खाडे, अनुपकुमार खाडे, निळकंठेश्वर खाडे, आशिष खाडे, सुशांत खाडे, नीलेशकुमार खाडे, वैभव खाडे यांचा समावेश आहे.रांजणी गावातील पीर साहेब महाराज यात्रा उत्सवात सादर झालेल्या कार्यक्रमात मंडळाने प्रेक्षकांसाठी पारंपरिक कलांची अफलातून मेजवानी दिली. गण, गवळण, मुजरा, बतावणी अफलातून सादर करत उपस्थित प्रेक्षकांना हसायला लावले. पीर साहेब यात्रा कमिटी व रांजणी ग््राामस्थांनी खाडे कुटुंबातील सर्व कलावंतांचा सत्कार केला.

तमाशा कलेची आयुष्यभर सेवा केलेल्या काळूबाळू यांचा शासनाने त्याकाळी पुरस्कार देऊन गौरव केला. त्यानंतर मात्र, काळूबाळूच्या कुटुंबीयांचा शासनाला विसर पडला. आजपर्यंत खाडे कुटुंबातील कोणत्याही कलावंताला कुठलाही पुरस्कार मिळालेला नाही. काळूबाळूचे नाव चालवणाऱ्या खाडे कुटुंबातील त्यांचे मुलगे, पुतणे, नातूंना पुरस्कार द्यावा. शासनाचे पॅकेज द्यावे.
- संभाजी खाडे, काळूबाळूंचे पुतणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT