Ranjan Taware on Ajit Pawar
बारामती: सहकार क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ब’ वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. ‘ब’ वर्गात अजित पवार यांची ताकद असली, तरी आमचाही उमेदवार पूर्ण ताकदीने लढेल. निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असे प्रतिपादन कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी केले.
याबाबत पत्रकारांशी बोलताना तावरे म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उमेदवारीचे स्वागत करतो तसेच आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की, उपमुख्यमंत्र्यांबरोबर काम करण्याची संधी मिळेल. त्यांच्याबरोबर काम करताना बरेच काही शिकायला मिळेल. त्यांच्याबरोबर काम करताना आनंद वाटेल.’ (Latest Pune News)
अजित पवारांनी ज्या जागेतून उमेदवारी अर्ज दाखल केला, त्या ‘ब’ वर्गामध्ये त्यांची ताकद अधिक आहे. त्यामुळे ते तेथून निवडून येतील. मात्र, आमचाही उमेदवार निवडणूक लढवेल. ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असा विश्वास तावरे यांनी व्यक्त केला.
सव्वाचारशे कोटी रुपये कर्ज...!
उपमुख्यमंत्र्यांबरोबर सध्या बैठका होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना तावरे म्हणाले की, माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसंदर्भात एकही बैठक झाली नाही आणि तसा विचारही नाही. माळेगाव कारखाना वाचवायचा हाच आमचा विचार आहे. कारखान्यावर सव्वाचारशे कोटी रुपयांचे कर्ज असून, कारखाना आर्थिक अडचणीत सापडला आहे.