पुणे

पुणे : रानगव्याला वन विभागाने केले जेरबंद

अमृता चौगुले

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : मागील दोन वर्षांपासून उजनी पाणलोट क्षेत्रालगतच्या गावांमध्ये शेतकर्‍यांच्या शेतातील ऊस पिकासह पाळीव जनावरांवर हल्ले करून हैदोस घालणार्‍या रानगव्याला पकडण्यास वन विभागाला यश आले आहे. इंदापूर तालुक्यातील उजनी पाणलोट क्षेत्रात मुबलक पाणी व बागायती क्षेत्र असल्यामुळे नजीकच्या कांदलगाव, हिंगणगाव, तरडगाव, शहा, महादेवनगर या गावांसह नागरी वस्तीमध्ये या रानगव्याचा वावर होता. अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील उसाच्या शेतीसह पाळीव जनावरांच्या गोठ्यात घुसून हा रानगवा धुडगूस घालत होता.

अनेक शेतकर्‍यांच्या गोठ्यातील गाई, म्हशी, लहान जनावरे रानगव्याने जागीच ठारदेखील केल्याच्या घटना घडत होत्या. या रानगव्याचा वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी भीमा नदीकाठच्या शेतकर्‍यांनी वारंवार केल्यानंतर वन विभागाने त्यास जेरबंद करण्यासाठी उपाययोजना आखल्या.

नागपूर येथून या रानगव्याला पकडण्याची परवानगी मिळाल्यानंतर त्यास वीस ते पंचवीस जणांचे पथक तयार करून तसेच बावधन येथील रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते. तब्बल चार तासांनी त्यास पकडण्यात यश आल्याचे इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी यांनी सांगितले. या रानगव्यास इंदापूर तालुक्यातून पकडून चांदोली अभयारण्यात सोडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शेतकर्‍यांच्या ऊस पिकासह इतर पिकांमध्ये धुडगूस घालणारा व जनावरांच्या गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ले करून गतप्राण करणार्‍या या रानगव्याचा बंदोबस्त केल्याने नागरिकांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT