पुणे

रामवाडी मेट्रो स्टेशन ते विमानतळ गॅप भरून काढणार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रामवाडी मेट्रो स्टेशन ते लोहगाव विमानतळ असा दोन किलोमीटरचा गॅप भरून, विमान प्रवाशांना मेट्रोच्या सार्वजनिक वाहतुकीचा लाभ घेता यावा, याकरिता मेट्रो पीएमपीसोबत मिळून रामवाडी ते लोहगाव विमानतळादरम्यान शटल सेवा सुरू करण्याचे नियोजन करत आहे. यासंदर्भात बैठका सुरू आहेत. लवकरच पुणेकरांना तिचा लाभ घेता येईल.

पुणे विमानतळाला मेट्रोची कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. मात्र, सध्या मेट्रोची धाव वनाज ते रामवाडीपर्यंतच आहे. त्यामुळे रामवाडी ते लोहगाव विमानतळ हा अंदाजे 2 किलोमीटरचा गॅप भरून काढण्यासाठी मेट्रो प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे मेट्रो प्रवाशांकरिता रामवाडी ते लोहगाव विमानतळापर्यंत शटल बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याकरिता पीएमपी प्रशासनाशी चर्चा सुरू आहे.

नुकतीच मेट्रोच्या तिसर्‍या टप्प्याची म्हणजेच रुबी हॉल मेट्रो स्टेशन ते रामवाडीपर्यंत मेट्रो ट्रेनची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात लवकरच मेट्रो आता थेट रामवाडीपर्यंत धावणार आहे. मात्र, विमान प्रवाशांनी मेट्रो विमानतळापर्यंत धावावी, अशी अनेकदा मागणी केली आहे. यासाठी मेट्रो प्रशासनाकडूनही प्रयत्न सुरू आहेत.

मात्र, सध्या ते शक्य नसले, तरी प्रवाशांकरिता लोहगाव विमानतळ ते रामवाडी मेट्रो स्थानकादरम्यान सार्वजनिक वाहतुकीच्या कनेक्टिव्हिटीची आवश्यकता असल्याचे अनेकदा समोर आले आहे. ही अडचण सोडविण्यासाठी मेट्रो पीएमपीच्या मदतीने येथे शटल सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहे. लवकरच यात यश मिळेल, असा विश्वास मेट्रो अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

रामवाडी मेट्रो स्टेशन ते लोहगाव विमानतळादरम्यान असलेला गॅप भरून, यादरम्यान विमान प्रवाशांना पीएमपीची शटल सेवा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. यासंदर्भात पीएमपी अधिकार्‍यांसोबत चर्चा सुरू आहे. ही सेवा सुरू झाल्यावर मेट्रोची थेट विमानतळाशी कनेक्टिव्हिटी होणार आहे.

– हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, जनसंपर्क अधिकारी, महा मेट्रो.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT