पुणे

रामोशी, बेरड समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

अमृता चौगुले

सासवड : पुढारी वृत्तसेवा :  स्वातंत्र्यलढ्यातील रामोशी, बेरड समाजाचे योगदान लक्षात घेऊन या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. सामाजिक समतेला आर्थिक समतेशिवाय अर्थ नाही, हे लक्षात घेऊन शासनाने राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केले. पुरंदर तालुक्यात भिवडी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दूरदृश्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला. याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर, राहुल कुल, वासुदेव काळे, माजी आमदार अशोक टेकवडे, बाबा जाधवराव, जालिंदर कामठे, गंगाराम जगदाळे, श्यामकांत भिंताडे, साकेत जगताप, जालिंदर जगताप, श्रीकांत ताम्हाणे, प्रशांत वांढेकर, श्रीकांत थिटे, अमोल जगताप, बापू मोकाशी आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, आद्यक्रांतिकारक राजे उमोजी नाईक यांच्या जीवनावरील चित्रपटाचा प्रस्ताव तयार झाला असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. रामोशी आणि बेरड समाजाला जातीचे दाखले देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 'राजे उमाजी नाईक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानामुळे आपण स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत. त्यांनी 5 हजार सशस्त्र सैन्य उभे करत इंग्रजांशी दिलेला लढा अंगावर रोमांच निर्माण करतो. वतनदार, सावकार यांना वठणीवर आणत त्यांनी गोरगरिबांची सेवा केली. ते उत्तम संघटक व शासक होते,' अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी उमाजी नाईक यांच्या कार्याचा गौरव केला.

आमदार राहुल कुल म्हणाले, 'रामोशी व बेरड समाजाच्या विकासाठी शासन प्रयत्नशील आहे. समाजाच्या विकासाठी महामंडळ स्थापन केले असून, त्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. येत्या अधिवेशनात या निधीमध्ये वाढ करण्याबरोबरच समाजातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.'

या वेळी दौलतनाना शितोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. राजे उमाजी नाईकांचे वंशज चंद्रकांत खोमणे, रमण आण्णा खोमणे यांच्यासह राज्यातील विविध भागांतून हजारोंच्या संख्येने आलेले रामोशी समाजबांधव उपस्थित होते. राजे उमाजी नाईक जयंती सोहळ्याचे आयोजन दौलतनाना शितोळे, सुधीर नाईक, बिट्टू भांडवलकर, गंगाराम जाधव, गणपत शितकल, लालासाहेब भंडलकर, साहेबराव जाधव, अमोल चव्हाण आदींसह संघटनेच्य पदाधिकार्‍यांनी केले. स्वागत रोहिदास मदने यांनी केले, प्रास्ताविक अंकुश जाधव यांनी केले, मनोगत विष्णू चव्हाण यांनी व्यक्त केले, सूत्रसंचालन विठ्ठल शितोळे यांनी केले, तर आभार नाना मदने यांनी मानले.

शासकीय स्मारकात अभिवादन
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या शासकीय स्मारकात दुपारी 12 वाजता प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार विक्रम राजपूत, गट विकास अधिकारी डॉ. अमिता पवार यांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर स्मारकासमोर उमाजी नाईक यांना मानवंदना देण्यात आली व त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे, क्षत्रिय रामोशी संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब चव्हाण, उदयनाथ महाराज, तात्यासाहेब भिंताडे, जेजुरी देवस्थानचे विश्वस्त पोपट खोमणे, रविकांत खोमणे, अनंताबापू चव्हाण, रमेश मोकाशी, विठ्ठल मोकाशी, सरपंच श्वेता चव्हाण, साधू दिघे, भैय्या खोमणे, सुनील जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT