पुणे: राज ठाकरे हे आघाडीत नाहीत. त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचे मिलन किंवा आघाडीबाबत आम्हाला माहिती नाही. अजून कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. दोघांचे भेटणे ही कौटुंबिक घटना आहे.
दोघे भाऊ हात मिळवत असतील, तर आम्हाला काही हरकत नाही. त्यांना आघाडीत घेणे किंवा न घेणे हा राजकीय विषय आहे. याचा निर्णय घ्यावा लागेल. यासंदर्भात पक्षाच्या पॉलिटिकल अफेअर्स समितीत चर्चा करण्यात येईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली. (Latest Pune News)
तथापि, काँग्रेसच्या पडत्या काळात पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. जे पक्षासोबत आहेत, त्यांना पक्ष कायम समर्थन देईल. त्यांच्या लढ्याला, संघर्षाला बळ देईल, असेही ते म्हणाले.
खडकवासला परिसरात आयोजित प्रदेश काँग्रेस नवनियुक्त कार्यकारिणीच्या कार्यशाळेच्या समारोप सत्रासाठी ते आले होते. मंगळवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, विश्वजित कदम, नसीम खान, प्रवक्ते अतुल लोंढे, खजिनदार अभय छाजेड आदी उपस्थित होते.