पुणे: ‘काँग्रेसच्या पडत्या काळात पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. जे पक्षासोबत आहेत, त्यांना पक्ष कायम समर्थन देईल. त्यांच्या लढ्याला, संघर्षाला बळ देईल. असे काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकार्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, नसीम खान यशोमती ठाकूर, अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, पवन खेरा, बी. एम संदीप, यू बी. व्यंकटेश,अतुल लोंढे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे आदी उपस्थित होते. (Latest Pune News)
चेन्निथला म्हणाले, जिल्ह्यात मशाल मोर्चा काढा व स्वाक्षरी मोहीम राबवून राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या लढाईला बळ द्यावे. ‘प्रदेश काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त नवीन चेहरे आहेत. काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे काम करा. लोकशाही वाचवण्याच्या लढाईत सर्वांनी सहभागी झाले पाहिजे.
राज्यात निधीचा घोटाळा: कदम
‘विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार सत्ताधारी पक्षातील आमदारच करत आहेत. ही तक्रार म्हणजे राज्य सरकारमध्ये निधीचा मोठा घोटाळा असल्याचे द्योतक आहे. अर्थसंकल्पात केलेली तरतूद जाते कुठे, असा प्रश्न पडतो, अशी टीका माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केली.
आता निवडणुका स्वबळावर लढवू द्या: वडेट्टीवार
‘देशासाठी इंडिया आघाडी झाली. महाराष्ट्रासाठी महाविकास आघाडी झाली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला पाहिजे. या निवडणुका आम्ही स्वबळावरच लढवू देत,’ अशी थेट मागणी काँग्रेसचे विधानसभेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीतला यांच्याकडे केली.
काँग्रेसचा मार्ग सत्याचा: खेरा
भाजपने फक्त खोटे वातावरण निर्मिती करण्याचे काम केले. काँग्रेसचा रस्ता हा सत्याचा आहे, तो कठीण आहे पण त्याच मार्गाने काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून चालत आला आहे व यापुढेही करील,’असे पवन खेरा यांनी केली.