पुणे : पुढारी वृत्तसेवा : श्रीराम कथा भारतीयांच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या हृदयात आहे. प्रत्यक्षात प्रत्येक भारतीयांच्या 'डीएनए' मध्ये रामकथा सामावलेली आहे. विविध ठिकाणी साधुसंत ही कथा असंख्य लोकांपर्यंत पोहोचवित आहेत. कलियुगाच्या वृक्षावर बसलेल्या संशयरूपी पक्ष्याला दूर करणारी ही कथा असून, आजच्या काळात श्रीराम कथेची संजीवनी युवकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कवी डॉ. कुमार विश्वास यांनी केले. पुणे जिल्हा अग्रवाल समाजातर्फे 'अपने अपने राम' या तीनदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अयोध्येमध्ये जानेवारी 2024 मध्ये पूर्णत्वास येत असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर स्थापनेच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. विश्वास म्हणाले, धर्म आणि अध्यात्माची चेतना ही सांसारिक कार्य झालेल्या व्यक्तींसाठी असते, हा समज आहे. भागवत, गीता हे ग्रंथ आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत. मात्र, आपण ते किती वेळा वाचतो, हे महत्त्वाचे आहे. आपण आपले बँक खाते आणि त्यातील बॅलन्स किती वेळा पाहतो आणि हे ग्रंथ किती वेळा वाचतो, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामनामाचा जयघोष करण्यात आला. तर, 'देवा श्री गणेशा, श्रीराम जानकी बैठे हे मेरे सीनेमे, सजादो घर को दुल्हन सा.. मेरे घर राम आये है' यांसह विविध गीतांच्या सादरीकरणाने सूरमयी प्रारंभ झाला. कविता तिवारी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.
संबंधित बातम्या :
'हृदयरूपी समुद्रमंथनातून अमृतकलश'
आपण पूजा करतो, परमेश्वराची प्रार्थना करतो, ती प्रत्येकाने मनापासून करायला हवी. जेवढी मनापासून प्रार्थना करू, त्यापेशा जास्त श्रद्धेने ईश्वर आपला स्वीकार करेल. समुद्रमंथानातून 14 रत्ने निघाली ही आपली आस्था आहे. जशी समुद्राची खोली कळत नाही, तशी हृदयाची खोलीदेखील कळत नाही. त्यामुळे आपण या हृदयरूपी समुद्राचे मंथन करत राहायला हवे, अशी आशा डॉ. विश्वास यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, समुद्रमंथनाच्या सुरुवातीला 'विष' बाहेर आले. त्याप्रमाणे आजच्या काळात सुरुवातीला प्रत्येकाला विषरूपी अपमानाला सामोरे जावे लागते. त्यानंतरच आपल्याला प्रतिभारूपी गाय म्हणजे 'कामधेनू' प्राप्त होते