वाल्हे: ऐन पावसाळ्यात राख (ता. पुरंदर) ग्रामपंचायत हद्दीतील वाड्या-वस्त्यांवरील जलस्रोतांची पाणीपातळी खालावल्याने परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील लोकांची तहान टॅंकरने भागवली जात आहे. जलजीवन मिशनची कामे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे येथील नागरिकांची तहान श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या टॅंकरच्या माध्यमातून भागवली जात आहे.
पुरंदर तालुक्यात यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला. परिणामी ऐन पावसाळ्यात नैसर्गिक जलस्त्रोत लवकरच आटून गेल्याने जमिनीतील पाणीपातळीत लवकरच खालावली. राख ग्रामपंचायत हद्दीतील गोरे-खंडाळेवस्ती येथे टॅंकर सुरू करण्यात आला असून पडळकरवस्ती, करेवस्ती, आलगुजदरा, कापडदरा आदी वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांची पाण्यावाचून मोठी हेळसांड होत आहे. दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट गणपती ट्रस्टच्या माध्यमातून या परिसरातील वाड्या-वस्त्यांवर टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
ऐन पावसाळ्यात पाऊस पडत नसून दिवसेंदिवस उष्णता वाढू लागल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावू लागल्याने अनेक गावांतील पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. शासन या गावातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी ठोस उपाययोजना करीत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
जलजीवन मिशनचे काम अपूर्णावस्थेत
'हर घर जल' या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत राख गावासाठी १२ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. एवढा मोठ्या प्रमाणावर निधी देऊनही अद्यापपर्यंत येथील काम पूर्णत्वास गेले नसल्याने येथे पाणीटंचाई जाणवत आहे.