इंदापूर: शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकेकाळी एकत्र आंदोलन करणारे, नंतर राजकीय मतभेदांमुळे दोन टोकांवर गेलेले राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे दोन्ही दिग्गज नेते शुक्रवारी (दि. 22) इंदापूर न्यायालय परिसरात तब्बल 14 वर्षांनंतर एकाच टेबलवर एकत्र बसल्याचे पाहायला मिळाले. न्यायालयीन कामकाजानंतर दोघांनी एकत्र चहाचा आस्वाद घेत जुन्या आठवणींना उजाळा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शेतकरी आंदोलनादरम्यान 2011 मध्ये दाखल झालेल्या खटल्यासाठी दोन्ही नेते इंदापूर न्यायालयात हजर झाले होते. राजकारणात अनेकदा एकमेकांवर थेट टीका करणारे शेट्टी आणि खोत शुक्रवारी मात्र जुन्या मैत्रीच्या आठवणीत रमल्याचे चित्र पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे, यापूर्वीही खटल्याच्या तारखेनिमित्त दोन्ही नेते न्यायालयात आले होते. मात्र, त्या वेळी त्यांनी एकमेकांकडे पाहणेही टाळल्याची चर्चा होती. शुक्रवारी मात्र वातावरण पूर्णपणे बदललेले दिसले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोघांनी ’चाय पे चर्चा’ केली. न्यायालय परिसरात उपस्थित कार्यकर्ते, वकील आणि नागरिकांनी हा प्रसंग उत्सुकतेने पाहिला.
या वेळी शेट्टी आणि खोत यांनी ही भेट केवळ जुन्या आठवणींना उजाळा देणारी असल्याचे स्पष्ट केले. “आंदोलनाच्या काळात आम्ही एकत्र होतो. खटला एकच असल्याने भेट झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही आजही एक आहोत,” अशी प्रतिक्रिया दोघांनी दिली.
दरम्यान, या दोन नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. आगामी काळात शेतकरी प्रश्नांवर दोघे पुन्हा एकत्र येणार का? नव्या राजकीय समीकरणांची नांदी सुरू झाली का? याबाबत आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क रंगू लागले आहेत.