Crime News Pudhari
पुणे

Pune Crime: आजारी मामाची हत्या करुन भाच्याची आत्महत्या; राजगुरुनगर हादरलं

माधवनगर परिसरातील धक्कादायक घटना; घटनास्थळी सुसाईड नोट आढळली, खेड पोलिसांकडून तपास सुरू

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: आजारपणात भाच्याच्या घरी राहण्यासाठी आलेल्या मामाचा भाच्याने धारदार कोयत्याने वार करून खून केला. त्यानंतर भाच्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजगुरूनगर येथील माधवनगर परिसरात शनिवारी ( दि १९) घडली.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संदीप वामन गडदे (वय ४३) असे खून झालेल्या मामाचे नाव असून, प्रवीण कैलास कोहिणकर (वय २०) असे आत्महत्या केलेल्या भाच्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संदीप गडदे हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते.

उपचार तसेच देखभालीसाठी ते सुमारे दोन महिन्यांपूर्वी माधवनगर येथील भाचा प्रवीण कोहिनकर याच्या घरी राहण्यासाठी आले होते. मात्र, शनिवारी सकाळी प्रवीणने धारदार कोयत्याने संदीप गडदे यांच्या गळ्यावर वार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संदीप यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

यानंतर प्रवीणने त्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच घरात मामाचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आणि भाच्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करताना पोलिसांना प्रवीणने लिहिलेली सुसाईड नोट मिळाली.

त्यामध्ये ‘मामाच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत आहे,’ असा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.खेड पोलिस सुसाईड नोटसह घटनास्थळावरील इतर पुरावे तपासण्यात येत आहेत. अधिक तपास खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT