खेड : राजगुरुनगर नगरपरिषदेच्या 21 नगरसेवकपदासाठी तब्बल 165 अर्ज दाखल झाले आहेत, तर अध्यक्षपदासाठी 11 अर्ज दाखल झाले आहेत. राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून अध्यक्षपदासह सर्व जागांवर उमेदवार देण्यात आले आहेत. महायुतीचे घटकपक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातच चुरशीचा सामना रंगणार आहे.
विशेष म्हणजे, शिवसेना (उबाठा) पक्षाकडे आमदार बाबाजी काळे यांच्या रूपाने महत्त्वाचे पद आहे. मात्र, त्यांच्याकडून पक्षीय स्वरूपात अथवा आघाडीच्या माध्यमातून राजगुरुनगर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवार देण्यात आलेले नाहीत. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्षाच्या वतीनेही निवडणुकीत उमेदवार म्हणून अर्ज आलेले नसल्याचे सांगण्यात येत आहे. खेड तालुक्यात 11 महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या विरोधकांचे नगरपरिषदेत मात्र जुळले नसल्याचे स्पष्ट झाले. राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी नगरपरिषदेतही हीच स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत असून, काहीही निकाल लागला तरी तीनही नगरपरिषदेत महायुती सत्तेत येणार असल्याचे समोर येत आहे. याचा परिणाम यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीवर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, राजगुरुनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याचा सोमवारी (दि. 17) अखेरचा दिवस होता. अनेक इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह प्रभागापासून ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत रॅली काढून अर्ज दाखल केले. भाजपच्या रॅलीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजी मांदळे व सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करताना भोसरीचे आमदार महेश लांडगे अग्रभागी होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अध्यक्षपदाचे उमेदवार किरण आहेर आणि इतर उमेदवारांचे अर्ज दाखल करताना माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिलबाबा राक्षे, पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर उपस्थित होते. शिवसेनेच्या माध्यमातून अध्यक्षपदाचे उमेदवार मंगेश गुंडाळ यांच्यासह इतर उमेदवारांचे अर्ज दाखल करायला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांना मिळाले दोन-दोन एबी फॉर्म?
माजी नगराध्यक्ष बापू किसन थिगळे यांनी नगराध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला आहे. त्यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाचा एबी फॉर्म जोडला असून, यामुळे ते मशाल चिन्हावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांना आंबेगाव तालुक्यातील देवदत्त निकम यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एबी फॉर्म मिळाला होता. मात्र, महाविकास आघाडीत चर्चा होऊन मशालीची उमेदवारी कायम ठेवली, असे बापू थिगळे यांनी सांगितले. राजगुरुनगर नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर उमेदवार आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.