खेड: राजगुरुनगर सहकारी बँक आता रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार 'फिनान्शियली साउंड अँड वेल मॅनेज्ड बँक' (एफएसडब्ल्यूएम) म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुदृढ आणि सुव्यवस्थापित बँक झाली आहे. त्यामुळे बँक व्यवसाय विस्तारास चालना मिळणार आहे, असे बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी सांगितले.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 'एफएसडब्ल्यूएम' संदर्भातील ठरवून दिलेले निकष जर एखादी बँक पूर्ण करीत असेल, तर बँकेने तसे घोषित करून रिझर्व्ह बँकेला माहिती द्यायची असते. राजगुरुनगर सहकारी बँकेची बुधवारी (दि. ११) संचालक मंडळाची बैठक झाली. (Latest Pune News)
त्या बैठकीत संचालक मंडळाने बँकेच्या २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाच्या वैधानिक लेखापरिक्षणाच्या प्रमाणित आर्थिक पत्रकांच्या निष्कर्षांनुसार राजगुरुनगर सहकारी बँक 'एफएसडब्ल्यूएम' म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुदृढ आणि सुव्यवस्थापित बँक असल्याचा ठराव मंजूर केला.
रिझर्व बँकेच्या नागरी सहकारी बँकांकरीता लागू असलेल्या परिपत्रकाचा आधार घेऊन आणि 'एफएसडब्ल्यूएम' म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुदृढ आणि सुव्यवस्थापित बँक वर्गीकरण करण्याच्या नियमांचे अवलोकन करुन, 'एफएसडब्ल्यूएम' बाबतच्या सुधारीत निकषांचे पालन केल्याचा ठराव केला.
ओसवाल म्हणाले, "ग्राहक हिताच्या सोयीसाठी इंटरनेट बँकिंग सुविधा देण्यास मान्यता मिळणे याबाबतचा प्रस्ताव रिझर्व बँकेकडे पाठविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राजगुरुनगर सहकारी बँक इंटरनेट बँकिंग सुविधेसाठी प्रस्ताव देणारी उत्तर पुणे जिल्ह्यातील पहिली नागरी सहकारी बँक आहे. तसेच दिवसेंदिवस व्यवसायात होणाऱ्या वाढीच्या आणि आर्थिक गुणवत्तेच्या जोरावर बँक शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळविणेकामी मार्गक्रमण करत आहे.
बँकेचा २९५२ कोटींचा व्यवसाय पूर्ण झाला असून अल्पावधीतच बँक ३ हजार कोटींचा टप्पा गाठेल." बँकेचा क्रार रेश्यो २२ टक्क्यांपर्यंत गेला असून सलग दुसऱ्या वर्षी नेट एनपीए शून्य टक्के राखण्यात बँकेला यश मिळाले आहे. नुकतेच बँकेच्या १८ व्या भांबोली शाखेचे उद्घाटन झाले असून येत्या वर्षभरात बँक अजून २ शाखा उघडेल.
बँकेने सभासदांचा ४ लाखांचा अपघाती विमा उतरविलेला आहे. बँकेचे कर्जदारांसाठी स्वेच्छेने कर्ज रकमेचा विमा उतरविण्यास सुरुवात केली आहे. तंत्रज्ञानात बँक अग्रेसर असून दैनंदिन डिजिटल ट्रान्झेक्शन सुमारे ५० हजार होत आहेत. बँकेच्या उत्तम कामगिरीमुळे बँकेला महाराष्ट्र राज्य को-ऑपरेटीव्ह बॅंक्स फेडरेशनतर्फे १००० ते २५०० कोटी ठेवींच्या गटातून पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट बँकेचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे, अशी माहिती ओसवाल यांनी दिली.
'एफएसडब्ल्यूएम' झाल्यामुळे बँकेला पुढीलप्रमाणे वाव मिळेल
कार्यक्षेत्र राज्याव्यतिरिक्त अन्य राज्यात व्यवसायाच्या संधी
नियमांस अधीन राहून स्वेच्छेने शाखा विस्तार करता येईल.
या नवीन सेफ डिपॉझिट लॉकरसह एक्स्टेंशन काऊंटर उघडता येतील. एक्स्टेंशन काऊंटरचे ठराविक व्यवसाय वाढीनंतर शाखेत रुपांतर करता येईल.
ऑफसाईट एटीएम सुविधा सुरु करता येईल.
बँकेला शाखा स्थलांतर करता येईल.
बँकेला डोअरस्टेप बँकिंग सुविधा देता येतील.