Illegal Hill Cutting Pudhari
पुणे

Rajgad Hill Destruction: राजगड परिसरात डोंगरांची कत्तल; बेकायदा उत्खननाने पर्यावरण धोक्यात

वृक्षतोड, प्लॉटिंगच्या नावाखाली डोंगरफोड; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

खडकवासला: सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि निसर्गसंपन्नतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजगड तालुक्यात सध्या निसर्गाचा मोठा विनाश सुरू आहे. विकास आणि उत्खननाच्या नावाखाली डोंगरांची राजरोस कत्तल केली जात असून, या डोंगरफोडीमागे नक्की कोणाचा वरदहस्त आहे? असा संतप्त सवाल आता सामान्य नागरिक आणि पर्यावरणप्रेमी विचारू लागले आहेत. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला असून, तालुक्याच्या तापमानातही कमालीची वाढ झाली आहे.

राजगड तालुक्यातील कोशिमघर, कांबेगी, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, पोळे, वरसगाव धरण परिसर, राजगड किल्ला भागातील अनेक गावांच्या हद्दीत जेसीबी आणि पोकलेनच्या साहाय्याने डोंगर फोडण्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. काही ठिकाणी गौणखनिजाचे बेकायदा उत्खनन, तर काही ठिकाणी फार्महाऊस आणि प्लॉटिंगच्या नावाखाली डोंगरांचे लचके तोडले जात आहेत.

स्थानिक महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने भूमाफियांचे धाडस वाढले असून, ऐतिहासिक किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गसौंदर्याला आता ओहोटी लागली आहे. निसर्गसंपन्नता, दाट झाडीसाठी ओळखला जाणारा हा ऐतिहासिक राजगड तालुका मात्र मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे निसर्गाचे चक्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हजारो झाडे तोडल्यामुळे जमिनीची धूप वाढली आहे.

डोंगरांवरील झाडे तोडल्याने तापमानाने उच्चांक गाठला आहे. विनापरवाना सुरू असलेल्या या डोंगरफोडीवर प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. अवैध उत्खनन करणाऱ्यांवर गुन्हे का दाखल होत नाहीत? असे प्रश्न आता स्थानिकांकडून विचारले जात आहेत. राजकीय वरदहस्ताशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर निसर्गाची कत्तल होणे शक्य नसल्याची चर्चा आता तालुक्यात रंगली आहे.

जमिनी विकत घेऊन धनदांडग्यांकडून खोदकाम

बेकायदा डोंगर फोडण्याचे आणि झाडे तोडण्याचे काम तातडीने थांबले नाही, तर भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल. प्रशासनाने कागदी घोडे नाचविण्यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर उतरून या निसर्गाच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. स्थानिक भूमिपुत्र जमिनी विकून रोजगारासाठी पुण्या-मुंबईला मोठ्या प्रमाणात विस्थापित झाला आहे. धनदांडग्यांनी जमिनी विकत घेऊन डोंगरांत राजरोस खोदकाम सुरू केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT