खडकवासला: राजगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गुंजवणी नदीवरील जीर्ण झालेला कोदवडी-आस्कवडीचा लोखंडी पूल शनिवारी (दि. 20) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोसळला. त्या वेळी पुलावरून खडी घेऊन जाणारा डंपर (एमएच 12, व्हीटी 6139) हा कोरड्या नदीपात्रात कोसळला. यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने पूल जीर्ण झाल्याने पूलावरील अवजड व हलक्या वाहनांची वाहतूक बंद केली आहे, तसे फलकही पुलाच्या सुरुवातीला लावण्यात आले आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून डंपर, ट्रॅक्टर आदी वाहनांची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे.
पूल कोसळल्याने राजगड भागातील 12 गावांचा संपर्क तुटला आहे. कोदवडी, आसनी दामगुडा, मंजाई आसनी, सोंडे आदी गावांतील विद्यार्थी, शेतकऱ्यांना दूर अंतराचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. पूल कोसळून नदीत डंपर कोसळल्याचे समजताच भाऊ दसवडकर आदी स्थानिक रहिवाशी नदीपात्रात उतरले.
कोरड्या नदीपात्रात कोसळलेल्या डंपरमधील चालकाला व त्याच्या सोबतच्या एकाला बाहेर काढले. वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते, हवालदार प्रसाद मानके, ज्ञानदीप धिवार, प्रसाद मानके, सुरज राऊत अंमलदार आकाश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सहायक पोलिस निरीक्षक किशोर शेवते म्हणाले, लोंखडी पूल जीर्ण झाल्याने पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे मात्र, अवजड वाहनांमुळे आज दुपारी पूल कोसळला.