Rajendra Hagawane and Sushil Hagawane Arrested
पुणे: पुण्यातून एक मोठा बातमी समोर आली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार असलेले राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना आज पहाटे अटक झाली आहे. बावधन पोलिसांकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्वारगेट परिसरातून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पहाटे 4.30 वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. हे दोघेही गेल्या सात दिवसांपासून फरार होते. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती. त्यानंतर आज या दोघांना अटक करण्यात आली आहे. (Latest Pune News)
नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने गळफास घेऊन जीवन संपवले; मात्र सुनेच्या अंगावर मारहाणीचे व्रण असल्यामुळे सासारच्यांनी तिचा खून केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. मुळशी तालुक्यातील भुकूम येथे शुक्रवारी (दि. 16) दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
वैष्णवी शशांक हगवणे (वय 24) असे जीवन संपवलेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी वैष्णवी यांचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना 26 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे; मात्र राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हे दोघे अद्याप फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
वैष्णवीच्या वडिलांनी बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्याविरोधात हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. हुंड्यासाठी वैष्णवीचे आयुष्य संपवले, असा दावाही करण्यात आला आहे