Rajegaon Model School Pudhari
पुणे

Rajegaon Model School: 1.26 कोटींच्या मॉडेल स्कूलचे काम रखडले; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ग्रामस्थांनी बांधकाम बंद पाडले

राजेगाव जिल्हा परिषद शाळेतील अपूर्ण कामांवर संताप; ठेकेदाराविरोधात शाळा व्यवस्थापन समितीची आक्रमक भूमिका

पुढारी वृत्तसेवा

रावणगाव: राजेगाव (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ‘मॉडेल स्कूल’ योजनेअंतर्गत १ कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असला, तरी संबंधित ठेकेदाराच्या संथ व निष्काळजी कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटूनही शाळेतील कामे अपूर्ण असल्याने संतप्त झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीने आणि ग्रामस्थांनी बुधवारी (दि. २२) काम बंद पाडले.

विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने मोठा निधी मंजूर केला. मात्र, प्रत्यक्षात पुणे येथील महिमन कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराकडून काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, शाळा परिसरात वाळू, सिमेंटच्या गोण्या, विटा, उघड्या सळया आणि बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त टाकण्यात आले आहे. त्यामुळे शाळेच्या परिसराला डंपिंग यार्डचे स्वरूप आले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांची गैरसोय आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी कामाचा वेग वाढविणे तसेच सुरक्षिततेचे नियम पाळण्याबाबत ठेकेदाराला वारंवार तोंडी व लेखी सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने समितीने अखेर कठोर भूमिका घेतली.

शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन सुरू असलेले काम बंद पाडले. ‘जोपर्यंत ठेकेदार कामाचा वेग वाढवून शाळा परिसर विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित करीत नाहीत आणि कामाच्या दर्जाबाबत ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत काम सुरू होऊ दिले जाणार नाही,’ असा इशारा समितीने दिला आहे.

कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही नियोजनाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचे चित्र राजेगावमध्ये दिसून येत आहे. आता शिक्षण विभाग आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन ठेकेदारावर काय कारवाई करतात आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षणाची सुविधा कधी उपलब्ध करून देतात, याकडे संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटला, तरी मुलांनी खेळायचे कुठे आणि वावरायचे कसे? एखादा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण?
गणेश वाघमारे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT