पुणे

राज ठाकरेंच्या सभेमुळे पोलिसांवर ताण; गेटवर गर्दी थोपवल्याने परिस्थिती झाली होती तणावग्रस्त

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा संपल्यावर गर्दी रोखताना पोलिस यंत्रणेवर प्रचंड ताण आला होता. सुमारे दहा हजारांची गर्दी या ठिकाणी झाल्याने गणेश कला क्रीडा मंचच्या प्रांगणात पोलिस व कार्यकर्ते यांची प्रचंड लोटालोटी झाली. पोलिसांनी अत्यंत संयमाने ही परिस्थिती हाताळली आणि पुढचा अनर्थ टळला. राज ठाकरे यांची सभा नेमकी कुठे घ्यायची, असा मोठा प्रश्न सुरक्षा यंत्रणेवर होता. सभेला परवानगी मिळते की नाही, याबाबतही साशंकता होती. नदीपात्रात ही सभा ठरली होती. मात्र, पावसाळा जवळ आल्याने तेही स्थान रद्द झाले.

अखेर गणेश कला क्रीडा केंद्रात राज यांच्या सभेला अनेक अटी घालून परवानगी देण्यात आली खरी, पण या सभागृहाची मर्यादा अवघी पंधराशेची आहे. मात्र, रविवारी सभेला सुमारे आठ ते दहा हजार लोकांची गर्दी झाली. सभागृह गर्दीने खचाखच भरले होते तेथे बरेच लोक दाटीवाटीने उभे राहून त्यांचे भाषण ऐकत होते, तर तेवढीच गर्दी सभागृहाच्या बाहेर झाल्याने मोठा पडदा लावून खुर्च्या टाकून बसण्याची व्यवस्था केली होती. मात्र, तीही जागा कमी पडली. बाहेर पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त होता. सुमारे शंभरच्या वर पोलिसांची कुमक होती. मोठे अधिकारी सभास्थानी हजर होते.

सकाळपासून गर्दीचा ओघ

सकाळी 11 वाजता सभागृह भरले. बाहेरही व्यवस्था झाली. राज यांची सभाही जोरदार झाली, मात्र सभागृह कमी अन् गर्दी जास्त झाल्याने बाहेर पडताना कार्यकत्र्यांत दाटीवाटी झाली. तेथून व्हीआयपींना जाता-येता एकच गेट ठेवल्याने राज ठाकरे जोवर सभास्थानावरून जात नाहीत, तोवर गणेश कला क्रीडा मंचच्या प्रांगणात गर्दीला पोलिसांनी रोखले. दहा मिनिटे झाली, पंधरा मिनिटे झाली, तरीही पोलिस गेट उघडेनात मग तरुणांनी 'जय श्रीराम'च्या घोषणा देत गेट लोटायला सुरुवात केली. त्यामुळे काही काळ तणावग्रस्त स्थिती झाली होती.

सारसबागेपर्यंत गर्दीचे लोंढे

रस्त्याने सारस बागेपर्यंत गर्दीचे लोंढे होते. पोलिस शांतपणे आवाहन करीत परिस्थिती हाताळत होते. सभा दुपारी 12 वाजता संपली होती, मात्र हा सर्व रस्ता रिकामा होण्यास दुपारचा एक वाजला, मगच पोलिसांवरचा ताण कमी झाला.

आम्हाला सभागृह पुरत नाही

राज ठाकरे यांनी सभेच्या सुरवातीला सांगितले की, आम्हाला सभेसाठी सभागृह वगैरे कमीच पडते. आपले मैदानच बरे अशी सुरुवात करताच टाळ्या व शिट्ट्यांचा गजर झाला. गर्दीला शांत करीत आता मी बोलू का, असे विचारताच जल्लोष शांत झाला आणि सभागृहात शांतता परसली.

महिला, ज्येष्ठांनी सोडला सुटकेचा निःश्वास

गेट समोरच्या पोलिसांवर प्रचंड ताण आला, पण ते हात हलवून गर्दीला शांत करीत होते. तेवढ्यात एका बाजूच्या गर्दीने बॅरिकेड्वरून उड्या मारत बाहेर प्रवेश केला. पण राज ठाकरे यांची प्रस्थान व्हायचे होते. त्या गर्दीला पोलिसांनी शांतपणे हाताळले. शेवटी गर्दी लोखंडी गेट लोटू लागताच पुन्हा पोलिसांवर ताण आला. त्यांनी पुन्हा गर्दीला प्रेमाने मागे लोटले. शेवटी अर्धे गेट उघडताच गर्दीचा लोंढा बाहेर पडला अन् पोलिसांसह त्या गर्दीत घाबरलेल्या महिला व वयोवृद्ध नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

SCROLL FOR NEXT