कोंढवा: सय्यदनगर रेल्वेगेट परिसरात मुसळधार पाऊस पडो अथवा रिमझिम, दरवर्षी पावसाळ्यात या ठिकाणी गुडघाभर पाणी साचते, रस्ते जलमय होतात, घरे व दुकाने पाण्यात जातात. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. तरीदेखील प्रशासनाची झोप जात नाही. यंदातरी प्रशासन जागे होईल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. गेल्या वर्षीचीच कामे अजूनही अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे.
सय्यदनगर रेल्वेगेट परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात तुंबत असून, स्थानिक व्यावसायिक, रहिवासी व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागत आहे. ड्रेनेज लाईन आणि पावसाळी नाल्यांचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्णच आहे. प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना एकाच संकटाचा सामना करावा लागतो. (Latest Pune News)
परिसरातील समस्या लोकांच्या तोंडपाठ झाल्या आहेत, प्रशासन गाढ झोपेत आहे, हे त्यांना समजले आहे. आता याच प्रश्नावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्वरित लक्ष्य घाला. अन्यथा, जनआंदोलनाला सामोरे जा, समस्येमुळे सय्यदनगरकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पावसाच्या पाण्यातून वाट काढणारे नागरिक, बंद पडलेले व्यवसाय, दूषित पाणी आणि डासांच्या उत्पत्तीमुळे साथीचे आजार परिसरात वाढू लागले आहेत.