फुरसुंगी: उरुळी देवाची गावातील जुन्या पालखी मार्गावर दीड-दोन फुटांपर्यंत पाणी साठले आहे, त्यामुळे दरवर्षी माउलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी जुन्या पालखी मार्गाने जाणार्या उरुळी देवाची व वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे आम्ही या रस्त्यावरून कसे जायचे, असा उद्विग्न सवाल येथील भाविकांनी केला आहे.
उरुळी देवाची गावातून लक्ष्मण वजन काट्याकडे जाणार्या जुन्या पालखीमार्गावर सुमारे 100 मीटर अंतरावर पावसाचे पाणी गेल्या महिनाभरापासून साठले आहे. रस्त्याच्या दुतर्फा झालेली बांधकामे यांमुळे याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास जागा नसल्याने रस्त्यावर दोन- अडीच फूट पाणी साठले आहे. (Latest Pune News)
त्यामुळे येथील वाहतुकीसाठी हा रस्ताच बंद झाला आहे. यामुळे उरुळी देवाची, वाड्या- वस्त्यावरील सासवडच्या दिशेने ये-जा करणार्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून, त्यांना दोन-तीन किलोमीटरचा वळसा घालून पुढे जावे लागत आहे.
हडपसर-सासवड या राष्ट्रीय महामार्गाने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 22 जूनला प्रस्थान करणार आहे. या सोहळ्यादरम्यान माउलींच्या पालखीचे, पादुकांचे दर्शन घेण्यासाठी, पालखीसोबत पायी वारी करण्यासाठी, वारकर्यांना फराळ वाटप करण्यासाठी उरुळी देवाची, शेवाळेवाडी, होळकरवाडी, औताडेवाडी, हांडेवाडी, वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी या भागातील भाविकभक्त, नागरिक जवळचा मार्ग म्हणून उरुळी देवाची गावातील या जुन्या पालखीमार्गाचा वापर करत असतात.
याशिवाय अनेक दिंड्या, वारकरी हे सुद्धा या मार्गाचा वापर करतात, मात्र सद्यस्थितीत या मार्गावर दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने भाविकांची मोठी गैरसोय होणार असेच दिसत आहे. याबाबत फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेच्या प्रशासकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही.
प्रशासन मात्र ढिम्मच
गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी पावसाळ्यात सतत पाणी साठते. मागील वर्षी तर याठिकाणी पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न येऊन वाहने याठिकाणी बंद पडत होती. महिन्याभरापासून याठिकाणी पाण्याने ठाण मांडले आहे. याबाबत वारंवार वृत्त प्रसारित करण्यात आले आहे, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आजही याठिकाणी परिस्थिती जैसे थे तैसेच आहे.