कळस(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जून महिना संपला तरी कळस (ता. इंदापूर) परिसरात पावसाचा पत्ता नसल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. दिवसभर आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी दाटून येते. मात्र पाऊसच पडत नसल्याने खरीप हंगामाची पेरणी रखडली आहे. दुसरीकडे पाण्याअभावी येथील पिकेदेखील जळू लागली आहेत.
यंदा पावसाने कमालीची दडी मारल्याने खरीप हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिसरातील विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी खालावली आहे. ऐन उन्हाळ्यात कशीबशी जगवलेली पिके ऐन पावसाळ्यात शेतकर्यांच्या डोळ्यासमोर जळून चालल्याने शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
परिसरात शेकडो हेक्टर क्षेत्रावर शेतक-यांची उसाची पिके आहेत. उसाच्या पिकाला पाण्याची मोठी गरज असते. अशातच पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. परिसरात ऊन-सावलीचा खेळ सुरूच असून, अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोसाट्याच्या वार्यासह ढग दाटून येतात व सायंकाळच्या वेळी आकाश निरभ— होत आहे. निसर्गाने पाठ फिरवल्याने परिसरातील गोसावीवाडी, पिलेवाडी, बागवाडी, बिरंगुडी, विठ्ठलवाडी आदी वाड्या-वस्त्यांवरिल शेतकर्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हेही वाचा