पुणे

पिंपरी : अखेर प्रतीक्षा संपली..! पावसाच्या सरींनी शहरात आनंदाचे वातावरण

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जून महिना संपत आला तरीही पाऊस नसल्याने हवेत उकाडा कायम होता. अखेर शनिवारी सकाळी मान्सूनच्या सरींनी शहरात हजेरी लावत नागरिकांना दिलासा दिला आहे. ऐन जून महिन्यात देखील दररोज वाढणारे तापमान आणि उकाडा यामुळे शहरवासीय जेरीस आले आहेत. पिंपरी- चिंचवड शहरात एखादा दिवस अपवाद सोडला तर दररोज 35 अंश तापमानाची नोंद होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यामध्ये 42 अंश उच्चांकी तापमानाची नोंद झाली. दिवस रात्र घामाच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. उकाड्यापासून सुटकेसाठी नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती ती शनिवारी अखेर संपली.

शनिवारी सकाळपासून वातावरण ढगाळ झाले होते. साधारण अकराच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. शहरात कुठे मध्यम तर कुठे तुरळक स्वरुपाचा पाऊस पडला. चिंचवड, मोहननगर, मोशी, चिखली, थेरगाव, वाल्हेकरवाडी या उपनगरांमध्ये पाऊस पडला. पुढील चार ते पाच दिवस आकाश ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

त्यामुळे आता उकाड्यातून सुटका होणार म्हणून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शहरात बहुतांश ठिकाणी रस्त्यांची कामे आणि ड्रेनेज दुरुस्तीची कामे सुरु असल्यामुळे पाऊस पडल्यानंतर रस्ते घसरडे झाले होते. त्यामुळे वाहतूक मंदावली होती. तसेच रस्त्याच्या कामांमुळे वाहुतक वळविण्यात आली आहे त्याठिकाणी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT