महाळुंगे पडवळ: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील चास गावात मागील 3 दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. याआधी मागील आठवड्यात ढगफुटीसदृश पावसामुळे परिसरातील शेतजमिनींमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले असून, शेतमालाचे आणि रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतांचे बांध फुटले असून, शेतीचे व्यवस्थापन कोलमडले आहे.
या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब चासकर यांनी आंबेगाव तहसील कार्यालयाकडे गावाच्या संपूर्ण क्षेत्राची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी पंचनामे करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पावसाळा अजून सुरूही झाला नसतानाच पावसाचे वातावरण तयार झाल्यामुळे शेतकर्यांमध्ये मशागतीविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.(Latest Pune News)
पुलावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत
घोडेगावला जोडणार्या पुलावर पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. विशेषतः भरधाव जाणार्या चारचाकी वाहनांमुळे दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. घोडेगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या या पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी आवश्यक तयारी न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली. पुलाच्या दोन्ही बाजूंना गटारांची व्यवस्था नसल्यामुळे संपूर्ण पाणी पुलावर साचले.