पुणे : प्रवाशांना लक्ष्य करून ऐवज चोरी करणाऱ्या हरियाणातील आंतराज्यीय टोळीचा पर्दाफाश करत लोहमार्ग पोलिसांनी पाच जणांना दिल्ली येथून अटक केली. त्यांच्याकडून सोने व हिरेजडीत दागिने असा ४० लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मोनू राजकुमार (वय 25), हवासिंग फत्तेसिंग (वय 66), अमित कुमार बलवंत सिंग (वय 31), अजय सतीश कुमार (वय 28), कुलदीप रामफळ (वय 28, राहणार, सर्व हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी मिरज रेल्वेस्थानक परिसरात एका महिला प्रवाशाच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. त्यावेळी आरोपी विमानाने दिल्ली येथे गेल्याचे समजले. तपासादरम्यान आरोपी हे आंतरराज्यीय टोळीचे सदस्य असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना दिल्ली विमान प्रशासन आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मदतीने ताब्यात घेतले. आरोपींनीकडून विविध चोरीच्या गुन्ह्यांतील सोन्याचे व चांदीचे दागिने, रोकड व इतर साहित्य जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ४० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींविरोधात मिरज रेल्वे स्टेशन येथे गुन्हे दाखल असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक अश्विनी सानप, अपर अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखा बाळासाहेब अंतरकर, सुभाष मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर कापुरे, पोलिस उपनिरीक्षक रूपाली गोरड, सुनील माने, धनंजय चव्हाण यांच्या पथकाने केली.