पुणे : कोल्हापूर-पुणे यात्रा विशेष गाडी क्रमांक 02012 गाडीला आग लागल्याचा नियंत्रण कक्षाला कॉल आला आणि प्रवाशांना वाचवण्यासाठी रेल्वे अधिकारी-कर्मचार्यांची एकच धावपळ उडाली. आळंदी रेल्वे स्थानकात गोंधळ उडाला. एनडीआरएफ आणि मेडिकल-रिलीफ ट्रेनही तातडीने पोहोचली. मात्र, त्यानंतर काही वेळाने येथे जमलेल्या बघ्यांच्या गर्दीला समजले की ही घटना प्रत्यक्षात नसून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बुधवारी मॉकड्रीलचे आयोजन केले होते.
पुणे-सातारा रेल्वे मार्गाच्या आळंदी स्थानकावरील कोल्हापूर-पुणे पॅसेंजर स्पेशल ट्रेनच्या स्लीपर ड-1 डब्याला आग लागल्याची माहिती आळंदी स्टेशन मास्तर यांनी बुधवारी दुपारी 03.25 वाजता नियंत्रण कक्ष पुणे यांना दूरध्वनीद्वारे दिली. अपघाताचा संदेश मिळाल्यानंतर विभागीय नियंत्रण कक्षाकडून सर्व विभागांना तत्काळ माहिती देण्यात आली आणि माहिती मिळताच अपघात निवारण गाडी आणि वैद्यकीय मदत गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून 03.45 वाजता अपघातस्थळाच्या दिशेने रवाना करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे आणि विभागीय संरक्षक अधिकारी देवेंद्र कुमार, वैद्यकीय पथक आणि रेल्वे सुरक्षा दलासह तत्काळ अपघातस्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू केले. अपघाताची माहिती एनडीआरएफ, एमसीओ, स्थानिक प्रशासन, पोलिस आणि राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागालाही देण्यात आली. ते सर्वजण अर्ध्या तासात आपापल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. जेव्हा सर्व अधिकारी आणि बचाव पथकातील सदस्यांना हे 'मॉकड्रील' असल्याचे समजले. मग त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. यानंतर मॉकड्रीलमध्ये डब्यात अडकलेल्या प्रवाशांना विविध उपकरणांद्वारे बाहेर काढणे, त्यांना रुग्णालयात नेणे, प्राथमिक उपचार करणे आदींचे प्रात्यक्षिके करण्यात आली.
हेही वाचा