रायरेश्वर पठारावर निसर्गाची उधळण; विविधरंगी फुले बहरली Pudhari
पुणे

Raireshwar Plateau: रायरेश्वर पठारावर निसर्गाची उधळण; विविधरंगी फुले बहरली

पर्यटनाच्या दृष्टीने परिसर दुर्लक्षितच

पुढारी वृत्तसेवा

अर्जुन खोपडे

भोर: भोर तालुक्यातील रायरेश्वर पठार सध्या रंगीबेरंगी फुलांनी व हिरव्यागार वेलींनी बहरून गेले आहे. पावसाळ्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान या पठारावर 10 ते 15 प्रकारची फुले एकमेकांत मिसळून एखाद्या गालिच्यासारखी पसरतात. वनदेवतेने अंथरलेला हा अनोखा गालिचा पाहण्यासाठी निसर्गप्रेमी व अभ्यासक दूरवरून येथे पोहचतात. भोर शहरापासून केवळ 27 किलोमीटर अंतरावर रायरेश्वर पठार आहे.

या पठाराचे ऐतिहासिक महत्त्वही तितकेच मोलाचे आहे. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. किल्ल्यावर आजही शिवकालीन शंकर मंदिर, पांडवकालीन लेणी, गायमुख, सात रंगांची माती अशी वैशिष्ट्‌‍यपूर्ण ठिकाणे आहेत. (Latest Pune News)

कर्नाटकहून आणलेल्या शिवा जंगमामुळे आजही जंगम समाजाचा वावर किल्ल्यावर दिसतो. सुमारे 12 किलोमीटर लांब व 2.5 किलोमीटर रुंद असलेले पठार हे ऐतिहासिक व नैसर्गिक सौंदर्याचे अप्रतिम मिश्रण आहे.

कोर्ले व रायरी गावावरून शिडीमार्गे किल्ल्यावर जाता येते. सध्या डोंगरातून वाहणारे धबधबे, हिरवाई आणि वाऱ्यावर डुलणारी फुलांची उधळण यामुळे रायरेश्वरकडे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. तथापि, प्राथमिक सोयी-सुविधांचा अभाव पर्यटकांसाठी मोठा प्रश्न ठरत आहे. पिण्याच्या पाण्याची, शौचालयांची, माहिती फलकांची आणि मार्गदर्शक व्यवस्थेची कमतरता जाणवते.

निसर्ग व इतिहास यांचा संगम असलेले रायरेश्वर पठारही कासप्रमाणे जागतिक पातळीवर नोंद घ्यावे, अशी निसर्गप्रेमी व अभ्यासकांची मागणी आहे. योग्य संवर्धन व पर्यटन सुविधा निर्माण झाल्यास रायरेश्वर पठार हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे आकर्षण ठरू शकेल.

कास पठार अन्‌‍ रायरेश्वर पठार

या पार्श्वभूमीवर रायरेश्वर पठाराची तुलना सातारा जिल्ह्यातील कास पठाराशी केली जाते. कास पठाराला जागतिक दर्जाचे मानांकन मिळाले असून तेथील जैवविविधतेचे संवर्धन आणि पर्यटन व्यवस्थापन अधिक सक्षमपणे केले जाते. मात्र रायरेश्वर पठार अद्याप दुर्लक्षित असल्याने येथील समृद्ध जैवविविधता आणि ऐतिहासिक वारसा योग्य प्रकारे जपला जात नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT