

वाल्हे: पुरंदर तालुक्यातील सीताफळ हे देशभरात प्रसिद्ध आहे. सध्या पावसाळी बहार सुरू आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी ढुमेवाडी (ता. पुरंदर) येथील फळ बाजारात उत्तम प्रतीच्या सीताफळाच्या एका कॅरेटला 4300 रुपये भाव मिळाला होता. यामुळे फळ उत्पादकांत आनंदाचे वातावरण होते.
मात्र, मागील तीन-चार दिवसांपासून उत्तम प्रतीच्या सीताफळाचा बाजार प्रतिकॅरेट 1500 ते 4300 रुपयांवरून 1000 ते 2100 रुपयांवर घसरला. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. (Latest Pune News)
मागील आठवड्यापासून, बाजारात आवक वाढल्याने आणि परराज्यांतील मागणी घटल्याने सीताफळाच्या बाजारभावात मोठी घसरण होत असल्याची माहिती सीताफळ उत्पादक तुकाराम भापकर यांनी दिली.
पावसातील खंड, अचानक पडलेला पाऊस अन् बदलत्या वातावरणाचा सीताफळाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. बाजारातील वाढलेली आवक, फळांची ढासळलेली गुणवत्ता यामुळे बाजारात अपेक्षित भावही मिळत नाहीत. मागील पंधरा दिवसांपूर्वी, सीताफळाला जो भाव मिळत होता, त्याच्या निम्मा भाव सध्या झाला आहे. त्यामुळे सीताफळ उत्पादकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.