Rahul Gandhi Latest News in Marathi
पुणे: लंडनमधील अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले नाही. त्यामुळे त्यांची बदनामी केल्याचा गुन्हा नाकबूल असल्याचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी शुक्रवारी न्यायालयात सांगितले.
लोकप्रतिनिधींवर दाखल दाव्यांची सुनावणी घेणार्या पुण्यातील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अमोल शिंदे यांच्यासमोर ही याचिका नोंदविण्यात आली. अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल याचिकेत दोषी नसल्याचा दावा केल्यामुळे आत्ता त्याच्या सुनावणीला सुरवात होणार आहे. (Latest Pune News)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटन दौर्यात 5 मार्च 2023 मध्ये ‘ओव्हरसीज काँग्रेस’च्या मेळाव्यात भाषण करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या मित्रांसमवेत एका मुस्लिम व्यक्तीला मारहाम केल्याने आनंद झाल्याचे एका पुस्तकात लिहिल्याचा दावा राहुल गांधींनी केला होता. त्यावर हे विधान खोटे आणि अवमानकारक असल्याची तक्रार सात्यकी सावरकर यांनी केली आहे.
याप्रकरणात, ’सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या आधारे विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना या दाव्याच्या सुनावणीला वैयक्तिक हजर राहण्यापासून कायमस्वरुपी सूट दिली असून, त्यांच्या वतीने याचिका नोंदविण्यास परवानगी दिली.
त्यानंतर न्यायालयाने तक्रार प्रत व त्यासंदर्भातील कागदपत्रे मिळाल्याबाबत विचारणा केली; तसेच आरोप वाचून दाखवित ’गुन्हा कबूल आहे का,’ अशी विचारणा केली. त्यावर, राहुल गांधी यांच्या वतीने गुन्हा कबूल नसल्याचे सांगितले,’ अशी माहिती अॅड. मिलिंद पवार यांनी दिली.
दरम्यान, सात्यकी सावरकर यांची बाजू मांडणारे अॅड. संग्राम कोल्हटकर यांनी आरोपीची याचिका नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितले. ’या प्रकरणी जानेवारीपासून पाठपुरावा सुरू होता. आता पुढील तारखेपासून फौजदारी प्रकरणाची सुनावणी सुरू होणार असून, दोन्ही पक्षांना साक्षी-पुरावे मांडून उलटतपासणीची संधी मिळणार आहे,’ असे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार, हे प्रकरण जलदगतीने चालविण्यासाठी कोणतीही दिरंगाई करू नका, अशा सूचनाही न्यायालयाने दोन्ही पक्षांना दिल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी आता 29 जुलैला सुनावणी होणार आहे.