Rahul Gandhi chhatron ki goonj pune
पुणे : 'देशात सुमारे ७० कोटी स्त्रीशक्ती असताना त्यांची स्वप्ने मुलगी, आई आणि पत्नी या 'मनुस्मृती'च्या चौकटीतील सामाजिक रूढी-परंपरेच्या बंधनात अडकली आहेत. मात्र, महिलांना स्वतःचे स्वप्न, स्वतःची कल्पना आणि विश्व असून, त्या स्वतंत्र आहेत, असे मत काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. तसेच, उपस्थित महिलावर्गाला आत्मविश्वासाचा संदेश देताना 'ब्रेक द केज' (पिंजरा तोडा) अशी हाक दिली.
काँग्रेस पक्षातर्फे आयोजित 'छात्रो की गूंज' या अभियानाचा चौथा टप्पा शनिवारी पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या (एआयएसएसएमएस) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला. या वेळी राहुल गांधी यांनी महिलांचे स्वातंत्र्य, शिक्षण, बेरोजगारी, सुरक्षा, समान संधी, अशा विविध विषयांना हात घालून विद्यार्थिनींशी संवाद साधला. या वेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करीत 'त्यांनी छात्रो की गूंज' कार्यक्रमाच्या व्यासपीठावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
गांधी म्हणाले, 'देशातील ६० टक्के महिला घरातून एकट्या जाऊ शकत नाहीत. ४५ टक्के महिला लग्नासाठी किंवा घरकामांमुळे स्वप्न दूर ठेवतात, तर केवळ ८ टक्के महिलांकडे स्वतःची मालमत्ता असून, ९२ टक्के महिला आपल्याकडे बंधनात आहेत. एकंदरीत, महिलेबाबतीत कोणत्या ना कोणत्या कारणाने हिंसाचार होत आहे. महिला पूर्णपणे मनुस्मृतीतील विचारांच्या अमलाखाली आहे.'
भारताची नेमकी ताकद ही अर्थव्यवस्था, सैन्य, वैद्यकीय व्यवस्था किंवा लोकसंख्या, यापेक्षा महिलांच्या सामर्थ्याला असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच, महिला पुरुषांपेक्षा अधिक संवेदनशील, प्रेमळ, सहृदय आणि भविष्याचा व्यापक विचार करणाऱ्या असतात, असे मतही त्यांनी नोंदविले.
दरम्यान, महिलांनी सामाजिक आणि मानसिक बंधनांमधून बाहेर पडावे. तुमचे वडील, भाऊ, पती किंवा मुलगा यांच्याशी नाते असू शकते; पण तुम्ही त्यांच्यापैकी कोणाच्याही मालकीच्या नाही,” असे सांगत गांधी यांनी महिलांच्या स्वतंत्र अस्तित्वाचा मुद्दा अधोरेखित केला.
या वेळी त्यांनी काही ठरावीक तरुणींना व्यासपीठावर बोलावून त्यांच्या दैनंदिन समस्या जाणून घेत त्यावर भाष्य केले आणि त्यांना सहानुभूतीदायक दिलासा दिला. तत्पूर्वी, गांधी यांनी काँग्रेसमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली तसेच 'छात्रो की गूंज' या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला महाविद्यालयाच्या वसतिगृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) आणि युवक काँग्रेसच्या (एनएसयूआय) गटात मोठा राडा झाला, त्या पार्श्वभूमीवर गांधी यांनी परिस्थितीचा आढावा घेत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.