अमृत भांडवलकर
सासवड: पुरंदर तालुक्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होताच राजकीय वातावरण तापले आहे. येत्या 5 फेबुवारीला निवडणुकीचा बार उडणार असून, त्याआधीच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यपदासाठी इच्छुकांनी कंबर कसली आहे. ‘यंदा काहीही झाले तरी नावापुढे जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य लागलेच पाहिजे,’ असा निर्धार अनेकांनी केला असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तयारी सुरू आहे.
पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 4 गट आणि पंचायत समितीचे 8 गण आहेत. तब्बल 9 वर्षांनंतर या निवडणुका होत असल्याने माजी सदस्यांसह नव्या इच्छुकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. फेबुवारी 2022मध्ये निवडणुका न झाल्याने जवळपास एक पूर्ण टर्म वाया गेली आहे. त्यामुळे इच्छुकांचा संयम सुटला असून, आता आणखी प्रतीक्षा न करता कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुकीची युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे.
निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी माजी सदस्यांसह इच्छुकांनी आर्थिक बळ उभे करण्यास सुरुवात केली आहे. जमीन, मालमत्ता, दागदागिने विकणे अथवा गहाण ठेवणे, साठवलेली रक्कम बाहेर काढणे अशा मार्गांनी तगडी रक्कम उभी केली जात आहे. भरमसाठ खर्च करून विजय मिळवण्याचा इरादा उघडपणे व्यक्त केला जात असून, तसा संदेश सोशल मीडिया पोस्ट्स, फ्लेक्स आणि बॅनर्समधून दिला जात आहे. ‘भावी जिल्हा परिषद सदस्य’, ‘भावी जनसेवक’, ‘यंदा दादाच’, ‘अण्णा’, ‘भाऊ’, ‘तात्या’, ‘अक्का’, ‘ताई’ अशा लेबलसह नावे गटा-गणांत जाणीवपूर्वक पेरली जात आहेत.
जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्यपदाला पुरंदर तालुक्यात मोठा सामाजिक आणि राजकीय मान आहे. तालुक्यातील तसेच गट-गणातील विविध कार्यक्रमांना सदस्यांना आवर्जून निमंत्रण दिले जाते. विवाह सोहळा, साखरपुडा, वाढदिवस, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा विशेष सन्मान केला जातो. पाहुणचार, मानपान आणि कार्यकर्त्यांचा गराडा हे या पदाचे अविभाज्य अंग बनले आहे. या मानसन्मानामुळेच सदस्यपदाभोवती मोठे वलय निर्माण झाले असून, इच्छुकांची संख्या वाढल्याने तीव स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी मतदारांना खूश करण्याचा खर्चिक सपाटा सुरू आहे. एकूणच, नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या निवडणुकांमुळे पुरंदर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक खर्चिक, चुरशीची आणि लक्षवेधी ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
गट-गणनिहाय कार्यकर्त्यांवर जबाबदारी
सोशल मीडियाद्वारे जनजागृतीपर एसएमएस, विविध प्रकारची प्रसिद्धी, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, प्रसिद्ध देवस्थानांना भेटी, सहलींचे आयोजन अशा मार्गांनी प्रचार केला जात आहे. प्रचारयंत्रणा अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी अनेक इच्छुकांनी इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सींची नेमणूक केली आहे. प्रत्येक कार्यक्रमासाठी प्रसिद्धी टीम, छायाचित्रण व व्हिडीओ चित्रीकरण केले जात असून, गट-गणनिहाय नेमून दिलेल्या कामांवर इच्छुक व त्यांचे प्रमुख कार्यकर्ते काटेकोर लक्ष ठेवून आहेत.