सासवड : पुरंदर तालुक्याचा पश्चिमेकडील भाग भात उत्पादक म्हणून ओळखला जातो. भातशेतीस अनुकूल हवामान आणि सुपीक जमिनीमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात भातलावणी केली जाते. यंदा भात कापणी अंतिम टप्प्यात असून, मिनी हार्वेस्टरच्या सहाय्याने पिकाची कापणी जलद गतीने केली जात आहे. यंदा पावसाचे प्रमाण योग्य असल्याने हळव्या व गरव्या भाताचे उत्पादन चांगले होणार असल्याचे सोमर्डीचे शेतकरी शांताराम भोराडे यांनी सांगितले.
भात पिकाची जवळपास एकाच वेळी लागवड होत असल्याने कापणीही एकाच वेळी करावी लागते. सध्या मजुरांची टंचाई भासल्याने अनेक शेतकऱ्यांनी मिनी हार्वेस्टर यंत्राचा आधार घेतला आहे. गराडे परिसरातील चतुर्मुख महादेव मंदिर परिसर, सोमुर्डी, दरेवाडी, थापे-वारवडी, रावडेवाडी, हनुमानवाडी, मठवाडी, तरडेवाडी, बांदलवाडी, ढोणेवाडी, दुरकरवाडी आदी गावांमध्ये हळव्या व अगाप गरव्या भाताची काढणी अंतिम टप्प्यात आहे.
शेतकऱ्यांनी मिनी हार्वेस्टरचा वापर केल्यामुळे वेळ आणि पैशांची बचत होत आहे. भात कापणे, गोळा करणे आणि झोडणीसाठीचा वेळ चार ते पाच दिवसांचे काम तीन ते चार तासांत पूर्ण होतो. मागील काही वर्षांपासून भाडेतत्त्वावर यंत्र घेऊन शेतकऱ्यांनी भात कापणी केली आहे, ज्यामुळे खर्चात मोठी बचत झाली आहे, असे गराडेचे शेतकरी कुलदीप जगदाळे व सोमर्डीचे शेतकरी मारुती भोराडे यांनी सांगितले.
पुरंदर तालुक्यात यावर्षी 1406 हेक्टर क्षेत्रावर भातलावणी झाली असून, सध्या पश्चिम भागात कापणी अंतिम टप्प्यात आली आहे, असे श्रीधर चव्हाण, कृषी अधिकारी, पुरंदर यांनी सांगितले.